हरारे ZIM vs AFG 1st T20I : इंग्लंड क्रिकेट संघानं क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. सॅम कुरन आणि टॉम करन हे दोन्ही भाऊ इंग्लंड संघाकडून खेळतात. दोन्ही भावांनी देशासाठी अप्रतिम क्रिकेट खेळलं आहे. त्यांनी जगभरात नावही कमावलं आहे. दरम्यान, त्यांचा भाऊ बेन कुरनची दुसऱ्या देशाच्या संघात निवड झाली आहे. त्याचा झिम्बाब्वे संघात समावेश करण्यात आला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेसाठी त्याचा प्रथमच संघात समावेश करण्यात आला आहे.
वडील झिम्बाब्वेसाठी क्रिकेट खेळायचे : सॅम कुरन, टॉम कुरन आणि त्यांचा मधला भाऊ बेन कुरन यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. त्यांचे वडील झिम्बाब्वेकडून क्रिकेट खेळले असले तरी, बेन करन 2022 पर्यंत नॉर्थम्प्टनशायरकडून खेळला आहे, परंतु त्यानंतर तो झिम्बाब्वेला गेला. त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेसाठी चमकदार कामगिरी केली आहे. प्रो50 चॅम्पियनशिप 2024/25 आणि लोगान कप 2024/25 प्रथम श्रेणी टूर्नामेंटमध्ये तो त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्यामुळं आता त्याची झिम्बाब्वेच्या राष्ट्रीय संघात निवड झाली आहे.
झिम्बाब्वे क्रिकेटनं दिली माहिती :झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात बहु-फॉरमॅट मालिका खेळवली जाणार आहे. ज्याचं यजमानपद झिम्बाब्वे संघ करणार आहे. मात्र, बेनची केवळ वनडे संघातच निवड झाली आहे. तो T20 संघाचा भाग नाही. झिम्बाब्वे क्रिकेटनं एका निवेदनात लिहिलं की, 28 वर्षीय कुरननं देशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीनंतर आपलं स्थान निर्माण केलं आहे. तो माजी झिम्बाब्वे आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक दिवंगत केविन कुरन यांचा मुलगा आणि इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू टॉम आणि सॅम कुरनचा भाऊ आहे.
T20 मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला T20 सामना : 11 डिसेंबर, हरारे
- दुसरा T20 सामना : 13 डिसेंबर, हरारे
- तिसरा T20 सामना : 14 डिसेंबर, हरारे