मुंबई Prize Money For Team India : टी 20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय क्रिकेट संघानं इतिहास रचला आणि दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. अंतिम फेरीत भारतानं दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) भारतीय संघाबाबत मोठी घोषणा केली आहे. आता भारतीय संघाला 125 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याचं जय शाहंनी सांगितलं आहे.
काय म्हणाले जय शाह : बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून भारतीय संघाचं टी 20 विश्वचषक 2024 जिंकल्याबद्दल अभिनंदन केलं. तसंच टीम इंडियासाठी 125 कोटी रुपयांचं बक्षीस रक्कम जाहीर करताना आनंद होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. ते पुढं म्हणाले, "संपूर्ण स्पर्धेत संघाने असामान्य प्रतिभा, जिद्द आणि खिलाडूवृत्ती दाखवली आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन."
भारतीय संघानं जिंकला चौथा आयसीसी विश्वचषक :रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं इतिहास रचला. या संघानं इतिहासात चौथ्यांदा विश्वचषक (एकदिवसीय, टी 20) जिंकला आहे. भारतीय संघानं शनिवारी (29 जून) टी 20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. या विजयामुळं 140 कोटी भारतीयांना आनंद साजरा करण्याची सुवर्णसंधी मिळाली. भारतीय संघानं दोनदा (1983, 2011) एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. तर त्यांनी फक्त दोनदा (2007, 2024) टी 20 विश्वचषक जिंकला आहे. संघानं शेवटचा विश्वचषक (एकदिवसीय मध्ये) 2011 मध्ये जिंकला होता. आता 13 वर्षांनंतर कोणथातरी विश्वचषक (टी 20 मध्ये) जिंकला आहे.