जमैका BAN won 1st T20I Series :तस्किन अहमदच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेश क्रिकेट संघानं वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात विजय मिळवत मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. बांगलादेशनं यजमान वेस्ट इंडिजचा 27 धावांनी पराभव केला आणि त्यांचा सलग दुसरा T20I सामना जिंकला. सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू शमीम हुसेनच्या 17 चेंडूत 35 धावांच्या नाबाद खेळीमुळं बांगलादेशनं सात विकेट्सवर 129 धावा केल्या. मेहदी हसन मिराजनंही 26 धावांचं योगदान दिलं. फिरकीपटू गुडाकेश मोतीनं 25 धावांत 2 बळी घेतलं.
सामन्यात पावसाचा व्यत्यय :पावसानं बांगलादेशच्या डावात दोनदा व्यत्यय आणला पण षटकांमध्ये कोणतीही कपात झाली नाही. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिज संघानं तस्किन (16 धावांत तीन विकेट), रिशाद हुसेन (12 धावांत दोन विकेट), मेहदी हसन (20 धावांत दोन विकेट) आणि तन्झीम हसन शाकिब (22 धावांत दोन विकेट) यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीचा सामना केला. 18.3 षटकांत 102 धावा झाल्या. यजमान संघाकडून रोस्टन चेसनं सर्वाधिक 32 धावा केल्या तर अकिल हुसेननं 31 धावांची खेळी केली.
बांगलादेशनं दाखवली ताकद : दुसऱ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. बांगलादेशच्या डावाची सुरुवात खूपच खराब झाली. लिटन दास आणि सौम्या सरकार ही सलामीची जोडी स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतली. लिटन दासनं 3 तर सौम्या सरकारनं 11 धावा केल्या. तनजीद हसनला 2 धावा करता आल्या. बांगलादेश संघानं 39 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. यानंतर मेहदी हसन मिराज आणि झाकेर अली यांनी क्रीझवर आपले पाय रोवण्याचा प्रयत्न केला पण ते एकमेकांना जास्त वेळ साथ देऊ शकले नाहीत. विकेट पडण्याची प्रक्रिया सुरुच होती. मात्र, शेवटी फलंदाज शमीम हुसेननं 35 धावांची नाबाद खेळी खेळून संघाला 129 धावांपर्यंत नेण्यात यश मिळवलं.
वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची निराशजनक कामगिरी : बांगलादेशच्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिज संघाची फलंदाजी खूपच कमकुवत दिसत होती. 3 फलंदाज वगळता कोणालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेसनं सर्वाधिक 32 धावांची खेळी खेळली. वेस्ट इंडिजचा संघ पूर्ण 20 षटकंही खेळू शकला नाही आणि 18.3 षटकांत केवळ 102 धावांत आटोपला. अशाप्रकारे वेस्ट इंडिजला मालिकेत दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं.
हेही वाचा :
- ट्रेडिशन कायम...! अंतिम सामन्याच्या 24 तासाआधीच जाहीर केली प्लेइंग 11
- एंड ऑफ ॲन ईरा...! 'अण्णा'चा क्रिकेटला अलविदा