ढाका Bangladesh Squad Announced : 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवली जाणार आहे. 8 संघांमध्ये खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी संघांची घोषणा सुरु झाली आहे. इंग्लंड संघानं आधीच आपला संघ निवडला होता. आता भारताच्या एका शेजारी देशानंही आपला संघ जाहीर केला आहे. पण या संघात सर्वात अनुभवी खेळाडूचा समावेश करण्यात आलेला नाही. या खेळाडूला तब्बल 447 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. पण गेल्या काही काळापासून हा खेळाडू एका वादात अडकला आहे.
भारताच्या शेजारी देशानं केला संघ जाहीर : बांगलादेश संघानं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला संघ जाहीर केला आहे. नझमुल हुसेन शांतो या संघाचं नेतृत्व करेल. त्याच वेळी, माजी कर्णधार आणि अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसनची संघात निवड झालेली नाही. अलिकडेच, शाकिब अल हसन सलग दुसऱ्यांदा बॉलिंग अॅक्शन टेस्टमध्ये नापास झाला आहे. अशा परिस्थितीत त्याची संघात निवड झालेली नाही. दुसरीकडे, लिटन दासलाही संघात स्थान देण्यात आलेलं नाही. तथापि, अनुभवी खेळाडू महमुदुल्लाह आणि मुशफिकुर रहीम या संघाचा भाग आहेत.
बांगलादेशचे सामने कोणत्या संघांशी : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेशच्या गटात भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या संघांचा समावेश आहे. ते 20 फेब्रुवारीपासून त्यांच्या मोहिमेला सुरुवात करतील. यात त्यांचा सामना टीम इंडियाशी होईल. हा सामना दुबईमध्ये खेळला जाईल. यानंतर बांगलादेश संघ पाकिस्तानला जाईल. 24 फेब्रुवारी रोजी रावळपिंडी इथं न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना खेळेल. यानंतर, 27 फेब्रुवारी रोजी रावळपिंडीमध्येच पाकिस्तानशी सामना होईल. गेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेश संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता. अशा परिस्थितीत, यावेळीही ती इतर संघांसाठी एक मोठा धोका ठरणार आहे.