अहमदाबाद Ayush Mhatre Century :श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या टीमनं सौराष्ट्रचा 5 गडी राखून पराभव केला आहे. विजय हजारे ट्रॉफी 2024-25 च्या या सामन्यात मुंबईनं चमकदार कामगिरी केली. मुंबईसाठी युवा फलंदाज आयुष म्हात्रेनं धमाकेदार शतक झळकावलं. आयुषनं 148 धावांची खेळी खेळली. तर जय बिश्टानं 45 धावांचं योगदान दिलं. तर सूर्यांश शेडगेने 4 बळी घेतले. श्रेयस अय्यरच्या संघानं 46 षटकांतच लक्ष्य गाठलं.
सौराष्ट्रची प्रथम फलंदाजी : अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात सौराष्ट्रनं प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 289 धावा केल्या. त्यांच्यासाठी विश्ववर्धन जडेजानं 98 धावांची तर चिराग जानीनं 83 धावांची खेळी खेळली. मुंबईकडून अष्टपैलू फिरकी गोलंदाज सुर्यांश शेडगेनं 4 बळी घेतले. यानंतर मुंबईचा संघ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा आयुष म्हात्रेनं आपल्या स्फोटक फलंदाजीनं सौराष्ट्राच्या गोलंदाजांना उद्ध्वस्त केलं. या उजव्या हाताच्या सलामीच्या फलंदाजानं येताच जोमानं फलंदाजीला सुरुवात केली आणि सहकारी सलामीवीर जय बिस्टासोबत अवघ्या 17.4 षटकांत 141 धावांची जबरदस्त शतकी भागीदारी केली.
67 चेंडूत शतक, 22 षटकार-चौकार :बिस्टा बाद झाल्यानंतरही आयुषचा कहर कायम राहिला आणि त्यानं स्पर्धेतील दुसरं शतक झळकावलं. दोन सामन्यांपूर्वीच त्यानं नागालँडविरुद्ध 181 धावांची चकित करणारी खेळी करणाऱ्या आयुषनं हीच शैली सुरु ठेवली. या 17 वर्षीय फलंदाजानं अवघ्या 67 चेंडूंमध्ये झंझावाती शतक झळकावलं आणि त्यानंतरही तो चौकार आणि षटकार मारत राहिला. आयुष 30व्या षटकात बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला, पण आऊट होण्यापूर्वी त्यानं केवळ 93 चेंडूत 148 धावांची अप्रतिम खेळी केली होती. आयुषनं आपल्या खेळीत 13 चौकार आणि 9 षटकारही मारले.
मुंबईचा या मोसमात सलग तिसरा विजय :विजय हजारे ट्रॉफीच्या या मोसमातील मुंबईचा हा सलग तिसरा विजय आहे. त्यांनी एकूण 7 सामने खेळले आहेत आणि 5 जिंकले आहेत. मुंबईचा पहिला सामना कर्नाटकविरुद्ध होता. कर्नाटकनं हा सामना 7 गडी राखून जिंकला. यानंतर दुसरा सामना हैदराबादमध्ये तर तिसरा सामना अरुणाचल प्रदेशमध्ये झाला. हे दोन्ही सामने मुंबईनं जिंकले. पण यानंतर पंजाबनं मुंबईचा 8 विकेट्सने पराभव केला. पण मुंबईनं पुनरागमन करत सलग तीन सामने जिंकले. त्यांनी सौराष्ट्रापूर्वी पॉंडीचेरी आणि नागालँडचा पराभव केला.
हेही वाचा :
- एका रनाची किंमत... 9999 धावांवर आउट झाला स्मिथ, ठरला दुसरा बॅट्समॅन; तर प्रसिध ठरला पहिला गोलंदाज, कसं?
- 13 महिन्यांनंतर पाहुण्यांविरुद्ध 'T20 स्टाईल'नं जिंकला वनडे सामना; 'कीवीं'ची मालिकेत आघाडी