ॲडलेड Playing 11 Announced : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यात बॉर्डर-गावस्कर मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेड ओव्हलवर खेळवला जाणार आहे. गुलाबी चेंडूनं खेळल्या जाणाऱ्या या कसोटी सामन्यात सर्वांच्या नजरा यजमान संघाच्या कामगिरीकडे लागल्या आहेत, ज्यांना या मालिकेतील पहिल्या सामन्यात 295 धावांनी एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला होता. अशा स्थितीत पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ ॲडलेड कसोटी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. पर्थ कसोटी सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियानं ॲडलेड कसोटी सामन्यासाठी आपल्या प्लेइंग 11 मध्ये बदल जाहीर केला आहे.
स्कॉट बोलंड करणार पुनरागमन : पर्थ कसोटी सामना संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. जेव्हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळं ॲडलेड कसोटीपूर्वी बाहेर पडला होता. आता त्याच्या जागी दुसऱ्या कसोटीच्या एक दिवस आधी यजमान संघाचा कर्णधार पॅट कमिन्सनं पत्रकार परिषदेत स्कॉट बोलंडचा प्लेइंग 11 मध्ये समावेश केल्याची पुष्टी केली आहे. या बदलाशिवाय ऑस्ट्रेलियन संघात कोणताही बदल झालेला नाही. स्कॉट बोलंडनं 2023 मध्ये झालेल्या ऍशेस मालिकेदरम्यान शेवटचा कसोटी सामना खेळला होता, त्यानंतर आता 519 दिवसांनंतर, तो पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन कसोटी संघाच्या प्लेइंग 11 मध्ये सामील झाला आहे.
स्कॉट बोलंडनं भारताविरुद्ध खेळले दोन कसोटी सामने :जर आपण स्कॉट बोलंडबद्दल बोललो तर त्यानं आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत फक्त 10 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी त्याला 2 सामने भारतीय संघाविरुद्ध खेळावे लागले आहेत. या कालावधीत बोलंडनं 27.80 च्या सरासरीनं 5 विकेट्स घेतल्या आहेत. भारताविरुद्ध मायदेशात कसोटी सामना खेळण्यासाठी बोलंड प्रथमच मैदानात उतरणार आहे. बोलंडच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं 10 सामन्यांमध्ये 20.34 च्या सरासरीनं 35 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यात तो एकदाच एका डावात 5 विकेट घेण्यात यशस्वी ठरला आहे.