ॲडलेड Australia Announced Squad : बॉर्डर-गावस्कर मालिका 2024-25 चा पहिला सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ इथं खेळला गेला. या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव करत मोठा विक्रम रचला. भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर सर्वात मोठा विजय नोंदवण्याचा विक्रम केला. त्याचबरोबर या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघात घबराट पसरली आहे. यामुळंच ऑस्ट्रेलियानं मिचेल मार्शला संघाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर मार्शच्या जागी ऑस्ट्रेलियन संघानं शेफिल्ड शिल्डमध्ये तस्मानियाकडून खेळणाऱ्या ब्यू वेबस्टरचा भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात समावेश केला आहे. मिशेल मार्शसाठी कव्हर म्हणून ब्यू वेबस्टरचा संघात समावेश करण्यात आला आहे.
30 वर्षीय अष्टपैलू खेळाडू संघात सामील : भारत 'अ' विरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेसह रेड बॉल क्रिकेटमध्ये त्याच्या अलीकडील चांगल्या कामगिरीमुळं वेबस्टरचा संघात समावेश करण्यात आला. भारत 'अ' विरुद्धच्या अनधिकृत 'कसोटी' मालिकेत, वेबस्टर हा ऑस्ट्रेलिया 'अ' साठी 72.50 च्या सरासरीनं 145 धावा करणारा दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्यानं 20 पेक्षा कमी सरासरीनं सात विकेट्सही घेतल्या.
काय म्हणाला वेबस्टर :30 वर्षीय ब्यू वेबस्टरला ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात स्थान मिळाल्यानं आनंद झाला आहे. बलाढ्य भारतीय संघाविरुद्ध ऑस्ट्रेलिया 'अ' संघासाठी काही धावा आणि विकेट मिळणं आनंददायी असल्याचे तो म्हणाला. जेव्हा तुम्ही 'अ' क्रिकेट खेळता तेव्हा ते कसोटी पातळीच्या एक पाऊल खाली असतं, त्यामुळं तुमच्यासाठी ते चांगलं असतं. संघात सामील होणं हा खरोखर अभिमानाचा क्षण आहे आणि मी त्याची प्रतीक्षा करु शकत नाही.