ॲडलेड AUS vs IND 2nd Test Day 2 Live : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील दुसरा कसोटी सामना ॲडलेड ओव्हलच्या मैदानावर गुलाबी चेंडूनं खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशीचा खेळ पूर्णपणे यजमान संघाच्या नावावर होता.
भारताची फलंदाजी अपयशी :भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण मिचेल स्टार्कच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळं भारतीय संघ पहिल्या डावात केवळ 180 धावांवरच मर्यादित राहिला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियन संघानं पहिल्या डावात 1 गडी गमावून 86 धावा केल्या होत्या, ज्यात मार्नस लॅबुशेन 20 आणि नॅथन मॅकस्विनी 38 धावांसह खेळत होते. आज सामन्याच्या चौथ्या षटकांत बुमराहनं मॅकस्विनीला बाद करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. अशा स्थितीत दुसऱ्या दिवसाचा खेळ दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
ॲडलेडमध्ये अश्विनचा उत्कृष्ट विक्रम : ॲडलेड कसोटीच्या पहिल्या दिवशी अश्विनला फक्त 1 षटक टाकण्याची संधी मिळाली. दुसऱ्या दिवशी भारताच्या कमबॅकमध्ये तो महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. या मैदानावर त्याचा उत्कृष्ट विक्रम आहे. ॲडलेडच्या मैदानावर झालेल्या 3 सामन्यांत त्यानं 2.64 च्या इकॉनॉमीनं 16 विकेट घेतल्या आहेत. गेल्या दौऱ्यातही त्यानं या मैदानावर शानदार गोलंदाजी केली होती आणि पहिल्या डावात 4 बळी घेतले होते, त्यामुळं ऑस्ट्रेलियाचा संघ 194 धावांत आटोपला होता आणि भारतानं 43 धावांची आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या डावात 36 धावांत ऑलआऊट झाल्यानं सामना गमवावा लागला.
स्टेडियमवर एकाच षटकात दोनदा अंधार :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲडलेड ओव्हल इथं सुरू असलेल्या डे-नाईट कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी एकाच षटकात स्टेडियमचे दिवे अचानक दोनदा गेले. यामुळं केवळ भारतीय खेळाडूच नाही तर ऑस्ट्रेलियन खेळाडूही नाराज झाले होते. मात्र, काही वेळातच फ्लड लाइट येऊ लागले आणि पुन्हा खेळ सुरु झाला. ही घटना 18व्या षटकात घडली. यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांनीही त्यांच्या मोबाईलचे फ्लॅश ऑन केले होते.