मँचेस्टर Aryan to Anaya : माजी भारतीय क्रिकेटर संजय बांगरचा मुलगा आर्यनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्याद्वारे त्याच्याबद्दल एक अनोखी गोष्ट समोर आली आहे. हा व्हिडिओ त्याच्या हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन प्रवासाचा आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, समोर आलेल्या व्हिडिओमध्ये बांगरचा मुलगा आर्यनचं मुलापासून मुलीत झालेले रुपांतर दिसून येतं. आर्यन बांगरनं त्याच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात त्याचे विराट, धोनी आणि त्याच्या वडिलांसोबतचे फोटो आहेत. हार्मोनल ट्रान्सफॉर्मेशन नंतर काही चित्रे देखील आहेत. 10 महिन्यांच्या शस्त्रक्रियेनंतर आर्यन आता अनया बनला आहे.
वडिलांसारखाच आहे क्रिकेटपटू :आर्यन बांगर हा देखील त्याच्या वडिलांसारखा क्रिकेटपटू आहे. तो डावखुरा फलंदाज आहे आणि इस्लाम जिमखाना या स्थानिक क्रिकेट क्लबकडून क्रिकेट खेळतो. याशिवाय त्यानं लीसेस्टरशायरमधील हिंकले क्रिकेट क्लबसाठीही खूप धावा केल्या आहेत.
अनया झाल्यानं आर्यन खूश : मुलीत रुपांतर होऊन, आर्यन आता अनया बनून आनंदी आहे. त्यानं त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं की, माझं क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी अनेक त्याग केले. पण या खेळाशिवाय, एक प्रवास देखील आहे, जो माझ्या स्वतःच्या शोधाशी संबंधित आहे. माझा हा प्रवास सोपा नव्हता. पण, यातील विजय हा माझ्यासाठी इतर सर्व गोष्टींपेक्षा मोठा आहे.