नवी दिल्ली Amit Shah on Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानमध्ये होणार आहे. याआधी भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. याबाबत विविध प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. आता भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी यावर मोठं विधान केलं आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या कोणतेही संबंध शक्य नसल्याचं त्यांनी जवळपास स्पष्ट केलं आहे.
भारतीय संघ पाकिस्तानात जाण्याचं चित्र गृहमंत्र्यांनी केलं स्पष्ट : 'स्पोर्ट्स तक'शी बोलताना अमित शाह म्हणाले, 'जोपर्यंत दहशतवाद पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत आम्ही पाकिस्तानशी चर्चेच्या बाजूनं नाही.' अमित शाह यांच्या या वक्तव्यानंतर भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जोपर्यंत पाकिस्तानातून दहशतवाद संपत नाही तोपर्यंत भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचं अमित शाह यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट झाले आहे. यापूर्वी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं.
काय म्हणाले होते राजीव शुक्ला : राजीव शुक्ला म्हणाले होते, 'चॅम्पियन ट्रॉफीच्या बाबतीत भारत सरकार जे काही करायला सांगेल ते आम्ही करु. भारत सरकारनं आम्हाला परवानगी दिली तेव्हाच आम्ही आमची टीम पाठवतो. त्यामुळं भारत सरकारच्या निर्णयानुसार आम्ही जाऊ, अशा परिस्थितीत बीसीसीआय सरकार जे म्हणेल ते करु, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. आता अमित शाह यांच्या वक्तव्यावरुन जवळपास हे स्पष्ट झालं आहे की, सरकार भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्याची परवानगी देऊ शकत नाही.