नवी दिल्ली AFG vs NZ Only Test : अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना आजही (13 सप्टेंबर) होऊ शकला नाही. ग्रेटर नोएडा इथं झालेला हा सामना अखेर रद्द करण्यात आला. खराब हवामान आणि त्याशिवाय अनेक गैरव्यवस्थापन हे सामना न होण्याचं कारण ठरले. मैदान आणि खेळपट्टी झाकण्यासाठी कव्हर्स आणि पंखे देखील तंबूगृहातून खरेदी केले गेले. सततच्या पावसामुळं अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड कसोटीचा पाचवा आणि शेवटचा दिवस खेळणं शक्य झालं नाही, त्यामुळं सामना अधिकाऱ्यांनी कसोटी सामनाच रद्द केला.
91 वर्षांत असं पहिल्यांदाच घडलं : अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात ग्रेटर नोएडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये खेळला गेलेला ऐतिहासिक एकमेव कसोटी सामना 91 वर्षातील भारतीय भूमीवरील पहिला कसोटी सामना पूर्णपणे रद्द करण्यात आला. भारतानं 1933 मध्ये मुंबई (जिमखाना मैदान, बॉम्बे) इथं प्रथमच कसोटी सामन्याचं आयोजन केलं होतं. त्यानंतर, भारतात झालेल्या कसोटी सामन्यात पहिल्यांदाच असं घडले, की चेंडू टाकल्याशिवाय पूर्ण कसोटी सामनाच रद्द करण्यात आला. आशियाबद्दल बोलायचं तर डिसेंबर 1998 मध्ये फैसलाबादमधील एक कसोटी सामना धुक्यामुळं एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला होता. हा कसोटी सामना पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात प्रस्तावित होता.
26 वर्षांत पहिलीच वेळ :ग्रेटर नोएडामध्ये सतत पडणारा पाऊस हे कसोटी सामना न होण्याचं एक कारण होते. दुसरीकडे, खराब ड्रेनेज व्यवस्था आणि संसाधनांचा अभाव यामुळं देखील पेच निर्माण झाला. कारण ग्राउंड स्टाफ देखील अतिवृष्टीपासून संरक्षण करण्यासाठी संपूर्ण मैदान झाकण्यात अपयशी ठरला. पाचव्या दिवशीही खेळ शक्य नसताना अधिकाऱ्यांनी 13 सप्टेंबरला सकाळी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक आणि एकही चेंडू टाकल्याशिवाय कसोटी सामना रद्द होण्याची ही 26 वर्षांतील पहिलीच वेळ आहे. 1998 मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कॅरिसब्रुक, ड्युनेडिन इथं झालेल्या सामन्यादरम्यान असं घडलं होतं.