AFG vs SA T20 World Cup :दक्षिण आफ्रिका टी-20 विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. उपांत्य फेरीत आफ्रिकेने अफगाणिस्तानचा 9 विकेट राखून पराभव केला. दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथमच टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला आहे. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ केवळ 56 धावांवरच आटोपला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 1 विकेट गमावून पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेसाठी रीझा हेंड्रिक्स 29 धावा आणि एडन मार्कराम 23 धावांवर नाबाद राहिला.
पहिल्या उपांत्य फेरी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी 11.5 षटकात 56 धावांत सर्व बाद झाला. आफ्रिकेकडून मार्को यानसेन आणि तबरेझ शम्सी यांनी सर्वाधिक 3-3 बळी घेतले. अफगाणिस्तानकडून अजमतुल्ला उमरझाईनं सर्वाधिक 10 धावा केल्या. उमरझाई हा संघासाठी दुहेरी आकडा पार करणारा एकमेव फलंदाज होता.
त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या क्रिकेट सामन्यात अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. राशिद खानने घेतलेला हा निर्णय चुकीचा ठरला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अफगाणिस्तानच्या फलंदाजांना मैदानावर टिकू दिलं नाही. सुरुवातीपासूनच आफ्रिकेच्या गोलंदाजांनी आपला दबदबा ठेवला होता.
अफगाणिस्तानची फलंदाजी :प्रथम फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तानला पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पहिला धक्का स्टार सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजच्या रूपाने बसला. तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर 8 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने (09) धावा करत गुलबदिन नायब बाद झाला. त्यानंतर चौथ्या षटकात अफगाणिस्ताननं दोन विकेट गमावल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी डावातील चौथे षटक आणणाऱ्या कागिसा रबाडानं पहिल्या चेंडूवर इब्राहिद झद्रान (02) आणि नंतर चौथ्या चेंडूवर मोहम्मद नबी (00) याला बाद केलं. त्यानंतर पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर संघाला पाचवा धक्का नांगेलिया खरोटे (00) च्या रूपानं बसला.
यानंतर सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अजमतुल्ला उमरझाईच्या रूपानं संघाने सहावी विकेट गमावली, ज्यानं 12 चेंडूंत 2 चौकारांसह 10 धावा केल्या. त्यानंतर 10व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर करीम जनात 8 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर त्याच षटकातील 5व्या चेंडूवर नूर अहमद खाते न उघडता बाद झाला. त्यानंतर चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असलेला कर्णधार राशिद खान 8 धावा करत बाद झाला.