कोलकाता Abhishek Sharma Record : भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला, जो भारतीय संघानं 7 विकेट्सनं जिंकला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय संघाला 133 धावांचं लक्ष्य देण्यात आलं होतं, जे त्यांनी अभिषेक शर्माच्या 79 धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर केवळ 12.5 षटकांत पूर्ण केलं. या खेळीसह अभिषेकनं युवराज सिंगचा 18 वर्षे जुना विक्रम मोडला आहे. अभिषेकनं त्याच्या खेळीदरम्यान फक्त 34 चेंडूंचा सामना केला आणि एकूण 8 षटकारही मारले.
इंग्लंडविरुद्धच्या T20 सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय खेळाडू : या सामन्यापूर्वी, भारतीय संघाकडून इंग्लंडविरुद्धच्या T20 सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम युवराज सिंगच्या नावावर होता. त्यानं 2008 मध्ये झालेल्या T20 विश्वचषकात डरबन इथं इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात सर्वाधिक षटकार मारले होते. त्याच्या 58 धावांच्या खेळीत एकूण 7 षटकार मारले गेले. आता, अभिषेक शर्मानं इंग्लंडविरुद्ध भारतासाठी T20 सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनण्याचा त्याचा 18 वर्षांचा जुना विक्रम मागे टाकला आहे. त्याच वेळी, अभिषेक आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील कोणत्याही T20 सामन्यात दोन्ही संघांकडून एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू आहे.