नवी दिल्ली Team India in Pakistan : भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा दौरा करावा अशी प्रत्येक पाकिस्तानी इच्छा असते. तरी रिपोर्ट्सनुसार, भारत हायब्रीड मॉडेलबद्दल बोलत आहे आणि भारतानं कोणत्याही किंमतीत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये यावं अशी पाकिस्तानची इच्छा आहे.
उच्चस्तरीय सुरक्षा पुरवत असल्यास पाकिस्तानला जावं : टी 20 विश्वचषक 2024 मध्ये विजेते झाल्यानंतर, भारताचं पुढील लक्ष्य आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंच्या उपस्थितीत भारत चॅम्पियन ट्रॉफी खेळणार असल्याचं जय शाह यांनी आधीच सांगितलं आहे. आता पाकिस्तानकडून आयोजित करण्यात येणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारत शेजारील देशात जाणार का, हा प्रश्न आहे. माजी फिरकीपटू तथा आम आदमी पक्षाचा खासदार हरभजन सिंगनं भारताच्या पाकिस्तान दौऱ्याची मागणी केली आहे. स्पोर्ट्स तकशी बोलताना भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगनं जर पाकिस्तान सुरक्षेसाठी उच्चस्तरीय सुरक्षा पुरवत असेल, तर भारतानं पाकिस्तानला जावं, असं म्हटलं आहे. संघाच्या सुरक्षेची खात्री होत नसेल तर संघानं पाकिस्तानात जाऊ नये, असंही हरभजन सिंगनं म्हटलं आहे. संघांना पूर्ण सुरक्षा मिळेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे असेल, तर सरकारनं याचा विचार करून अखेर निर्णय घ्यावा. तसंच ही बाब केवळ क्रिकेटशी संबंधित नाही, तर याच्याही पुढं असल्याचं भज्जी म्हणाला.