मुंबई Most Wickets in Debut Test Match : सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी सामन्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. एकीकडे भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत व्यस्त आहे. दुसरीकडं, पाकिस्तान संघही मायदेशात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडविरुद्ध यजमानपद भूषवत आहे. कसोटी क्रिकेटचं स्वतःचं महत्त्व आहे आणि त्यात सहभागी होणं हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असतं. त्यातच एखाद्या क्रिकेटपटूनं पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावलं किंवा गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली तर तो चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण करतो.
भारतीय खेळाडूनं पदार्पणाच्या सामन्यात केला विश्वविक्रम :भारतीय क्रिकेट संघाचा माजी लेग-स्पिनर नरेंद्र हिरवाणीचा कसोटी पदार्पण कोण विसरु शकेल, जो आज (18 ऑक्टोबर) आपला 56वा वाढदिवस साजरा करत आहे. हिरवाणीनं जानेवारी 1988 मध्ये चेन्नईमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण करतानाच कहर केला. त्या सामन्यात हिरवाणीनं पहिल्या डावात 61 धावांत आठ गडी बाद केले. त्यानंतर दुसऱ्या डावात 75 धावांत आठ विकेट्स घेतल्या. म्हणजेच नरेंद्र हिरवाणीनं पदार्पणाच्या कसोटी सामन्यात 136 धावांत 16 बळी घेतले. पदार्पणाच्या कसोटी सामन्यातील ही कोणत्याही गोलंदाजाची सर्वोत्तम गोलंदाजी होती. त्याचा हा विक्रम आजही कायम आहे. जेव्हा हिरवाणीनं हा पराक्रम गाजवला तेव्हा त्याचं वय अवघे 19 वर्षे 85 दिवस होतं. हिरवाणीच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघानं तो सामना 255 धावांनी जिंकला. त्या सामन्यात भारतीय संघाचे कर्णधार रवी शास्त्री होते.
कोणाच्या नावावर आणखी विक्रम :तसं पाहिलं तर, पदार्पणाच्या कसोटी सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजीच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा बॉब मॅसी हिरवाणीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. मॅसीनं 1972 मध्ये लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडविरुद्ध 137 धावांत 16 बळी घेतले होते. या यादीत इंग्लंडचा फ्रेडरिक मार्टिन तिसऱ्या क्रमांकावर आहे. 1890 मध्ये झालेल्या ओव्हल कसोटीत मार्टिननं कांगारु संघाविरुद्ध 102 धावांत 12 बळी घेतले होते.