नागपूर Koradi Navratri Festival 2024 :आजपासून आदिशक्तीच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्तानं विदर्भात प्रसिद्ध असलेल्या कोराडीच्या जगदंबा मातेची आख्यायिका आपण जाणून घेणार आहोत. नवसाला पावणारी आई म्हणून देखील कोराडीची महालक्ष्मी जगदंबा देवी प्रसिद्ध आहे. पूर्वी कोराडी जाखापूर या नावानं ओळखलं जायचं. जाखापूरचा राजा झोलन याला सात पुत्र होते. जनोबा, नानोबा, बानोबा, बैरोबा, खैरोबा, अग्नोबा आणि दत्तासूर. परंतु एकही कन्यारत्न नसल्यानं राजा दु:खी होता. त्यानं यज्ञ, हवन, पूजा, तपश्चर्या करुन देवाना प्रसन्न केलं आणि एक कन्यारत्न मागितलं. दिव्य, पवित्र, तेजोमय रुप गुणसंम्पन्न कन्येच्या रुपानं आदिमाया जगदंबा देवी अवतरली. गुणसंम्पन्न कन्येच्या रुपानं अवतरलेल्या आदिमाया जगदंबा देवीची अनेक दिव्य अनुभूती राजाला येई. एका युद्धप्रसंगी आदिमाया जगदंबेनं राजाच्या शत्रुविषयी देखील योग्य निर्णय देऊन न्यायप्रियतेचं दर्शन घडवलं. झोलन राजाला आदिमायेच्या दिव्य शक्तीचा पुन:प्रत्यय आला. अवतारकार्य पूर्ण झाल्यामुळे सूर्य मावळल्यानंतर देवी ज्या स्थानी विराजमान झाली, ते ठिकाण म्हणजे जाखापूर, साक्षात शक्तीपीठ.!
कोराडी मंदिराचं हेमाडपंथी बांधकाम : महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी हे नागपूरच्या उत्तरेस जवळपास 15 किमी अंतरावर आहे. कोराडी देवी मंदिर परिसराचं अगोदरच्या काळी 'जाखापूर' हे नाव होतं. आई जगदंबेची मूर्ती स्वयंभू आहे. मंदिराचं बांधकाम हेमाडपंथी होते.
काय आहे झोलन राजा आणि जाकुमाईची अख्यायिका : झोलन राजाच्या पत्नीला म्हणजेच राणी गंगासागर यांना कन्यारत्न झालं. कन्येचा जन्म होताच नगरातील प्रजा खूप आनंदी झाली. जिकडं तिकडं उत्सव साजरे केले जात होते. राजकन्येला बघण्यासाठी आल्यानंतर आईची स्वर्णीम कांती, उज्ज्वल तेज, सौम्य हास्य, अत्यंत आकर्षक मुखमंडळ, तेजस्वी डोळे, आकर्षक कान, भव्य मस्तक असं कन्येचं रुप पाहून राजाचे नेत्र दीपक होते. राजाला असं वाटलं की कन्या नसून दिव्यशक्ती आपल्या घरी मुलीच्या रुपानं अवतरली आहे. नंतर शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणं आई जाकुमाई वाढू लागली. त्यांचं सर्वतोमुखी दिव्य तेज आणि सुंदरता याची राजवाड्यात चर्चा होऊ लागली.
किराडच्या राजानं घातली लग्नाची मागणी : झोलन राजाच्या नगराच्या सीमेपलीकडील भागामध्ये किराड राजाची नगरी होती. किराड राजाच्या कन्येनं जंगलात फिरत फिरत मैत्रिणी सोबत आणि काही निवडक सैन्यासोबत झोलन राज्याच्या नगरात प्रवेश केला. राजाच्या सैनिकांनी अनोळखी व्यक्ती आपल्या सीमेत आलेली पाहून राजासमोर आणलं. तेव्हा झोलन राजाची कन्या जाकुमाई राजदरबारात उपस्थित होती. झोलन राजानं सर्व विचारपूस केल्यानंतर सन्मानानं त्याच्या नगरीत पाठवून दिलं. तेव्हा किराड राजाच्या कन्येनं झोलन राजाची मुलगी, तिचं अप्रतिम सौंदर्य आपल्या वडिलांना सांगितलं. किराडच्या राजानं झोलन राजाच्या मुलीला आपल्या मुलांसाठी मागण्याचा मनात विचार केला. त्याबाबत राजानं दुतामार्फत संदेश पाठवला.