डेहराडून (उत्तराखंड) Bandrinath Dham Open Today : हिंदूमध्ये चार धामची यात्रा करणं अत्यंत पुण्यदायी मानले जाते. त्यामुळे भाविकांना बद्रीनाथ येथील दरवाजे उघडण्याची प्रतिक्षा असते. देशातील चारधामांपैकी एक असलेल्या बद्रीनाथ धामचे दरवाजे पुजेनंतर अत्यंत भक्तीमय वातावरणात आज उघडण्यात आले. बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे पुढील सहा महिने भाविकांसाठी खुले राहणार आहेत.
10 मे रोजी 3 धामांचे दरवाजे उघडले: गंगोत्री, यमुनोत्री आणि केदारनाथ धामचे दरवाजे 10 मे रोजी उघडण्यात आले. त्यानंतर आज बद्रीनाथ धामचे दरवाजेही उघडण्यात आले आहेत. बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याकरिता आज पहाटे 4 वाजल्यापासून प्रक्रिया सुरू झाली. रिमझिम पावसात सैन्यदलाचे वाजणारे बँड, ढोलकीचे मधुर सूर, स्थानिक महिलांचे पारंपारिक संगीत आणि भगवान बद्रीनाथाचे स्त्रोत अशा भक्तीमय वातावरणानं भाविकांना विलक्षण प्रसन्नतेचा अनुभव आला.
दरवाजे उघडण्याची अशी प्रक्रिया सुरू झाली
- धार्मिक परंपरेनुसार पूजन करत कुबेर, उद्धव आणि गडू घागरी दक्षिण दरवाजातून मंदिरात आणण्यात आल्या. मंदिराचे मुख्य पुजारी रावल, धर्माधिकारी, हक हक्कधारी आणि बद्री केदार मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकारी आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत विधीनुसार दरवाजे उघडले.
- मुख्य पुजारी व्हीसी ईश्वर प्रसाद नंबूदिरी यांनी गर्भगृहात भगवान बद्रीनाथांची विशेष प्रार्थना करत सर्वांना यात्रेच्या शुभेच्छा दिल्या. पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी बद्रीनाथमध्ये अखंड ज्योती आणि भगवान बद्री विशाल यांचे दर्शन घेतले.
उत्तराखंडमध्ये धार्मिक पर्यटनाला चालना-दरवाजे उघडण्याच्या एक दिवसापूर्वीपासून बद्रीनाथ धाम येथे भाविकांची गर्दी झाली. गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि शेवटी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडल्यानं आता उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा पूर्णपणे सुरू झाली. उत्तराखंडमध्ये धार्मिक पर्यटनाला आता चालना मिळू लागली आहे. बद्रीनाथ मंदिर, तप्तकुंड, नारद कुंड, शेष नेत्रा तलाव, नीळकंठ शिखर, उर्वशी मंदिर, ब्रह्म कपाल, माता मूर्ती मंदिर, वैकुंठ धाम प्रथम गाव माण, भीमपुल, वसुधारा आदी स्थळांवरही पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. दरवर्षी बद्रीनाथ धाममध्ये पाच लाखांहून यात्रेकरून दर्शनासाठी येतात. मात्र कोरोनाच्या संकटामुळे २०२१ मध्ये केवळ 1,97,997 भाविक आले होते. कोरोना संपल्यानंतर ही संख्या वाढून 17,63,549 भाविकांनी बद्रीनाथाचं दर्शन घेतलं होतं. तर 2023 मध्ये 18,39,591 भाविकांनी दर्शन घेतले.
काय आहे बद्रीनाथ तीर्थस्थळाचं महत्त्व?बद्रीनाथाला पृथ्वीवरील वैकुंठ म्हटलं जातं. हे तीर्थस्थळ चमोली जिल्ह्यातील अलकनंदा नदीच्या काठावर आहे. बद्रीनाथ हे हिंदूंच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे, हे मंदिर वैष्णवांच्या 108 दिव्य स्थांनामध्ये प्रमुख मानलं जातं. बद्रीनाथ मंदिर परिसरात 15 मूर्ती आहेत. त्यामध्ये भगवान विष्णूची एक मीटर उंच काळ्या पाषाणातील मूर्ती प्रमुख आहे. बद्रीनाथ धाममध्ये भगवान विष्णू ध्यानस्थ मुद्रेत बसलेले आहेत. त्यांच्या उजव्या बाजूस कुबेर, लक्ष्मी आणि नारायण यांच्या मूर्ती आहेत. भगवान बद्रीनारायणाची अर्थात विष्णुची 5 रूपांची पूजा केली जाते. भगवान विष्णूच्या या पाच रूपांना 'पंच बद्री' असेही म्हणतात.
हेही वाचा-
- केदारनाथमध्ये बम बम भोलेचा गजर! मंदिराचे दरवाजे उघडले; यात्रेला जल्लोषात सुरुवात - Kedarnath Yatra 2024
- शिल्पा शेट्टीनं केदारनाथ धाम आणि माँ वैष्णो देवीच्या दर्शनामधील व्हिडिओ केला शेअर, पाहा पोस्ट - Shilpa Shetty