शिर्डी (अहमदनगर) Govindgiri Maharaj On PM Modi : 22 जानेवारीला पार पडलेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सलग 11 दिवसांचा कडक उपवास केला होता. भगवान श्रीरामची अयोध्योतील मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मोदींनी गोविंदगिरी महाराजांच्या हातून रामाचे चरणामृत प्राषण करुन उपवास सोडला. त्यामुळं कोण आहेत गोविंदगिरी महाराज असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
कोण आहेत गोविंदगिरी महाराज : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात प्रवरा नदी काठी वसलेले बेलापूर हे छोटेसं गाव आहे. याच गावात मदन गोपाल व्यास यांच्या कुटुंबात 1949 साली किशोर व्यास यांचा जन्म झाला. पूर्वीचे किशोर हे आताचे गोविंदगिरी आहेत. गोविंदगिरी याचं प्राथमिक शिक्षण बेलापूर गावातच झालं आहे. त्यांचा जन्म धार्मिक कुटुंबात झाल्याने प्राचीन अध्यात्मिक शास्त्रांचा अभ्यास, भक्ती आणि धार्मिकतेचा वारसा त्यांना पालकांकडून मिळाला आहे.
गोविंदगिरी यांचा प्रवास :प्राथमिक शिक्षणानंतर ते प.पू. पांडुरंग शास्त्री आठवले यांनी स्थापन केलेल्या तत्वज्ञान विद्यापीठात दाखल झाले. पांडुरंग शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी बी.ए. तत्वज्ञानमध्ये पदवी घेतली. पुढील शिक्षणासाठी ते वाराणसीत गेले. तेथे त्यांनी ‘दर्शनाचार्य’ ही पदवी प्राप्त केली. वाराणसीत त्यांना प्रसिद्ध वैदिक अभ्यासक, वेदमूर्ती डॉ. विश्वनाथजी देव यांच्याकडून मार्गदर्शन घेण्याचं भाग्य लाभलं. दरम्यान 120 वर्षांच्या कौटुंबिक परंपरेला पुढे नेत त्यांनी प्रथम त्यांच्या मूळ गावी 'श्रीमद्भागवत' वरील धार्मिक प्रवचन सादर केलं होतं. त्यावेळी ते 17 वर्षांचे होते.
प्राचीन ग्रंथांवर प्रवचन: गेल्या अनेक वर्षापासून ते श्रीमद्भागवत, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, दासबोध, योग वसिष्ठ आणि भारतीय संस्कृतीचा पाया असलेल्या अध्यात्मिक साहित्याच्या इतर मौल्यवान आणि प्राचीन ग्रंथांवर प्रवचन देत आहेत. प.पू. स्वामी सत्यमित्रानंद गिरीजी यांच्या हस्ते रविवार, 30 एप्रिल 2006 रोजी गंगा नदीच्या तीरावर असलेल्या हरिद्वारच्या पवित्र स्थळी त्यांना परमहंस संन्यास दीक्षा देण्यात आली. या सन्यासानंतर स्वामींना पूर्वी आचार्य किशोरजी व्यास म्हणून ओळखले जात होते, ते गोविंदगिरी झाले.
गोविंदागिरी महाराजांच्या हातून सोडला उपवास : अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्मितीच्या कामाची जबाबदारी 6 जणांच्या खांद्यावर आहे. त्यात अध्यक्ष म्हणून महंत नृत्य गोपाल दास, उपाध्यक्ष चंपत राय, सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील के. पराशरण, माजी आयएएस अधिकारी नृपेंद्र मिश्रा, समितीचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंदागिरी महाराज, भाजपाचे वरिष्ठ नेता कामेश्वर चौपाल याचं योगदान आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्मिती करण्यात मोलाचे योगदान असलेल्या गोविंदागिरी महाराज यांच्याच सांगण्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 दिवसांचा उपवास केला होता.
हा क्षण आमच्यासाठी अभिमानाचा: श्री राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर गोविंदगिरी महाराजांच्या हातून हा उपवास सोडण्यात आला. गोविंदगिरी महाराज आजही जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्या मुळ गावी येवून नातेवाईकांना भेटतात. पंतप्रधान मोदी यांनी गोविंदगिरी महाराज यांच्या हस्ते चरणामृत घेत उपवास सोडला. हा क्षण आमच्यासाठी अभिमानाचा असल्याचं व्यास यांचे नातेवाईक आणि ग्रामस्थ यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- मराठमोळा रांगोळी कलाकार पोहोचला थेट अयोध्येत; आकर्षक रांगोळ्यांची रामभक्तांना भुरळ
- सोलापूरच्या चित्रकाराची अनोखी रामभक्ती; रक्ताने साकारली प्रभू श्री रामांची प्रतिमा
- राम मंदिर लोकार्पण सोहळ्या निमित्त प्रभू श्रीरामाच्या चरणी ५५१ किलो बुंदीचा लाडू अर्पण