महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

किती लाडक्या बहिणींना मंत्रिमंडळात स्थान मिळणार? 'या' नावांची होतेय चर्चा - WOMEN MLA CABINET MINISTERSHIP

राज्यातील महायुती सरकारमध्ये मंत्रिपदासाठी कोण-कोणत्या लाडक्या बहिणींची नावं सध्या चर्चेत आहेत. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

WOMEN MLA CABINET MINISTERSHIP
मनीषा कायंदे, चित्रा वाघ, देवयानी फरांदे, पंकजा मुंडे (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2024, 7:48 PM IST

मुंबई :विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला तरी अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही. परिणामी शपथविधी लांबीवर गेला आहे. अनेक कारणांमुळं हा शपधविधी लांबणीवर गेल्याचं बोललं जात आहे. महायुतीत तिन्ही पक्षात मुख्यमंत्रिपदावरून नाव निश्चित न होणं, कोणाला किती मंत्रीपदं द्यायची आणि कुठली खाती द्यायची यावरून महायुतीत एकमत होत नसल्यामुळं शपथविधी पुढे ढकलण्यात आल्याचं दिसतय. दरम्यान, आता 5 डिसेंबरला शपथविधी होणार असल्याची चर्चा आहे. महायुतीत अनेक आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्याचं चित्र आहे.

लाडक्या बहिणींना किती मंत्रीपदं? : राज्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही योजना गेमचेंजर ठरली. महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्यास ही योजना कारणीभूत ठरली असंच महिलांच्या मतदानाचं प्रमाण आणि निकालावरुन दिसतय. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला. परंतु ज्या महिला आमदार अर्थात लाडक्या बहिणी आहेत. त्या लाडक्या बहिणींना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का? महायुतीतील प्रमुख लाडके भाऊ या लाडक्या बहिणींना किती मंत्रीपदं देणार? या मंत्रिपदासाठी कोण-कोणत्या लाडक्या बहिणींची नावं सध्या चर्चेत आहेत, पाहूया...

मंत्रीपदासाठी 'या' लाडक्या बहिणींची चर्चा :एकीकडे महायुतीत मुख्यमंत्री कोण ते नाव निश्चित होत नसताना शपथविधीला विलंब होत आहे. तर दुसरीकडे, महायुतीत समन्वय नसल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. तीन पक्षातील अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक असताना, ज्या लाडकी बहीण योजनेमुळं महाराष्ट्रात क्रांती घडवली. त्या योजनेतील लाडकी बहीण अर्थात महिला लोकप्रतिनिधींना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का? आणि किती लाडक्या बहिणींना मंत्रीपद मिळणार? यावर सध्या जोरात चर्चा रंगू लागल्या आहेत. या लाडक्या बहिणींमध्ये पंकजा मुंडे, देवयानी फरांदे, अदिती तटकरे, चित्रा वाघ, मनीषा कायंदे, निलम गोऱ्हे, मनिषा चौधरी, मंदा म्हात्रे आणि विद्या ठाकूर या नावांची जोरदार चर्चा आहे. सरकारनं लाडक्या बहिणींना जवळ करून त्यांच्या पदरात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याला 1500 रुपयांची ओवाळणी टाकली. मात्र, महिला लोकप्रतिनिधींच्या पदरात मंत्रिपदाच्या रुपानं ओवाळणी मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महिलांची संख्या कमीच दिसेल : "महायुतीचं सरकार होतं, तेव्हा आदिती तटकरे वगळता कोणतीही महिला मंत्रिमंडळात दिसली नाही. त्याच्याआधी महाविकास आघाडी सरकारमध्ये यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड, अदिती तटकरे अशा मोजक्याच महिला मंत्री होत्या. पण आता अनेक लाडक्या बहिणींच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा असली तरी, यावेळी सुद्धा महिलांची नावं मंत्रिमंडळात कमी दिसतील. कारण महिलांबाबत संघाची भूमिका ही 'प्रो' राहिलेली नाही. स्त्रियांच्या बाबतीत स्वतंत्र्याची भूमिका संघानं मांडलेली नाही. त्यामुळं संघाच्या विचारसरणीनुसार, मंत्रिमंडळात खूपच कमी महिलांना स्थान मिळेल," असं राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना म्हटलं आहे.

मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी : "अदिती तटकरे यांना मंत्रिपदाचा अनुभव आहे. त्यांचं राजकीय कनेक्शन असल्यामुळं त्यांना मंत्रिपद मिळेल. मात्र पंकजा मुंडे, मनीषा कायंदे, देवयानी फरांदे आदी महिलांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता फारच कमी दिसते. दुसरीकडे उपसभापती नीलम गोऱ्हे यांची 2026 मध्ये मुदत संपतेय. त्यानंतर त्यांची मंत्रिपदासाठी वर्णी लागू शकते. कारण त्यांचा राजकीय अनुभव पाहता त्यांचं नाव मंत्रिपदासाठी पुढे होऊ शकतं. पण सध्या मंत्रिमंडळात महिलांची संख्या म्हणजे लाडक्या बहिणींची संख्या नेहमीप्रमाणे फारच कमी दिसेल," असंही राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी म्हटलं आहे.

लाडक्या बहिणींप्रमाणे लाडके भाऊही मंत्रिपदासाठी इच्छुक :कोणत्या लाडक्या बहिणींच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार, याबाबत काही महिला लोकप्रतिनिधींची नावं चर्चेत असताना दुसरीकडे लाडक्या बहिणींप्रमाणे लाडके भाऊही मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचं दिसून येत आहे. यासाठी अनेक आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. मंत्रिपदासाठी त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. यात शिवसेनेचे आमदार भरत गोगावलेंनी आपणाला मंत्रिपद मिळावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे. मागच्यावेळी मंत्रिपद मिळालं नाही, मात्र आता आपल्याला मंत्रिपद मिळेल, असा विश्वास गोगावलेंनी व्यक्त केलाय. आमदार संजय शिरसाट यांनीही आता आपल्याला मंत्रिपद मिळेल, असा आशावाद व्यक्त केला आहे.

मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार : भाजपाचे गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला मंत्रिपद मिळावं, अशी इच्छा व्यक्त केलीय. यावेळी मुरबाड मतदारसंघाला मंत्रिपद मिळावं, अशी मतदारसंघातील जनतेची इच्छा असल्याचं मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी म्हटलं आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांनीही आपणाला मंत्रिपद मिळावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही आपणाला मंत्रीपद मिळावं, असं म्हटलंय. यासह आमदार प्रताप सरनाईक, प्रवीण दरेकर, नितेश राणे, आशिष शेलार, बबनराव लोणीकर, राजेंद्र गावित, दादा भुसे, सुहास कांदे, यांची नावही मंत्रिपदाच्या चर्चेत आहेत. किती लाडक्या बहिणींना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, याची चर्चा असताना आता राज्यात अनेक लाडके भाऊ अर्थात अनेक आमदारही मंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचं सध्यातरी चित्र दिसतय.

हेही वाचा

  1. "ईव्हीएम हॅक होत असेल, तर सिद्ध करून दाखवावं"; रावसाहेब दानवे यांचं ओपन चॅलेंज
  2. मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग; 'या' खात्यांवरून अडलंय घोडं, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही हवीत 'ही' खाती
  3. राज्यातील अनेक पराभूत उमेदवारांची व्हीव्हीपॅट मोजणीची मागणी, काही उमेदवारांनी भरले शुल्क

ABOUT THE AUTHOR

...view details