महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

जयंत पाटलांबाबत संकेत देत शरद पवारांनी डाव साधला; राजकीय अर्थ काय? - MAHA VIKAS AGHADI CM POST CANDIDATE

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक होत आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करा, अशा प्रकारचं आव्हान महायुती आणि महाविकास आघाडी एकमेकांना देत आहेत.

MAHA VIKAS AGHADI CM POST CANDIDATE
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून रस्सीखेच (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2024, 9:10 PM IST

मुंबई : महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेना पक्षात रस्सीखेच सुरू आहे, त्यातच इस्लामपूर येथील जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी निवडणुकीत जयंत पाटील मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात, अशा प्रकारचे संकेत दिल्याने महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून खळबळ उडाली. शरद पवारांच्या अशा प्रकारच्या संकेतामागचं नेमकं कारण काय असू शकतं? यावर राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 'शिवस्वराज्य यात्रे'ची सांगता इस्लामपूर येथे गुरुवारी झाली. समारोपाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं कौतुक केलं. महाराष्ट्र राज्याचे भविष्य घडवण्यासाठीची क्षमता जयंत पाटील यांच्यात आहे. राज्याचं नेतृत्व करण्याची जबाबदारी स्वीकारावी, अशा प्रकारची इच्छा जनतेची असल्याचं म्हणत एकप्रकारे मुख्यमंत्रिपदाबाबतचे शरद पवारांनी संकेत दिल्याचं बोललं जात आहे. जयंत पाटील यांच्या भाषणाला सुरुवात झाली त्यावेळेस कार्यकर्त्यांनी 'जयंत पाटील भावी मुख्यमंत्री' अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. त्यावेळेस फक्त घोषणा देऊन मुख्यमंत्री होत नसतं. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते, असं म्हणत कार्यकर्त्यांना शांत केलं होतं.

वावगं काय? - नितीन राऊत :काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी मंत्री नितीन राऊत म्हणाले की, "हे मुख्यमंत्रिपदाबाबत प्रमोशन नाही. शरद पवारांच्या बोलण्यात वावगं काय? सगळ्याच पक्षातील नेतृत्वाबद्दल असं बोललं जात असतं. आमच्या पक्षातील मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबतचा निर्णय दिल्लीतील पक्षश्रेष्ठी घेतील."

एका पक्षात चार, पाच चेहरे कसे? - संजय राऊत :जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी देण्याचे संकेत शरद पवारांकडून दिले जात असल्याचं समोर येत आहे, यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, "अशा प्रकारचे संकेत शरद पवार देत असतात. तसं काही असेल तर त्याबाबत आम्ही चर्चा करू. मधल्या काळात रोहित पवार यांच्यावर देखील मोठी जबाबदारी देण्याची घोषणा केली होती. एका पक्षात दोन मुख्यमंत्री होत नाहीत. मधल्या काळात सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांचं नाव चर्चिले जात होतं. त्यामुळं एका पक्षात चार-पाच मुख्यमंत्रिपदाचे चेहरे कसे असू शकतात हा माझा प्रश्न आहे."

यांचं नाव चर्चेत :राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांना पसंती आहे. जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांची नावंही समोर येत होती. आता प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावाचे संकेत दिल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत - हेमंत देसाई : "पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा तसेच आम्ही देखील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचं दाखवून देण्याच्या उद्देशाने अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं असावं. राष्ट्रवादी काँग्रेस एक संघ होता त्यावेळी मुख्यमंत्रिपदाची संधी असताना पक्षानं मुख्यमंत्रिपद आपल्याकडं घेतलं नाही. त्या बदल्यात महत्त्वाची खाती घेतल्याचं सगळ्यांनी बघितलं आहे. पक्षात फूट पडल्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत ठाकरे गट आणि काँग्रेस पक्ष आले. आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांमधील देखील उत्साह कमी व्हायला नको या सर्व गोष्टींचा विचार करता शरद पवार यांनी जयंत पाटील यांचं कौतुक करून सूचक विधान केलं असावं. मात्र, विधानसभा निवडणुका संपन्न होणं गरजेचं आहे. त्यानंतर समजेल की राज्यात महाविकास आघाडीला की महायुतीला बहुमत मिळेल, आणि त्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण असेल या प्रश्नाचं उत्तर मिळेल," असं हेमंत देसाई म्हणाले.

एका दगडात दोन पक्षी? : ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षात मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून तू तू मै मै सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला घराणेशाहीवरून पुन्हा एकदा महायुतीतील नेत्यांकडून लक्ष केलं जाऊ शकतं. त्यामुळं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत शरद पवार यांनी संकेत देऊन पक्षातील जयंत पाटील यांचं वर्चस्व दाखवून देत आम्ही देखील मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत पाठीमागे नसल्याचं महाविकास आघाडीला दाखवून दिलं आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

हेही वाचा

  1. शरद पवारांकडे अनेकांची घरवापासी मात्र ठाकरेंची दारं अद्याप बंदच, हे ठाकरेंचं यश की अपयश?
  2. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 1962 ते 2019 : काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपा, शिवसेनेच्या विजयाचा रंजक इतिहास
  3. राज्यातील १०४ आमदार करतात शेती, ५० आमदारांचा व्यवसाय 'समाजकार्य'; A to Z माहिती फक्त एका क्लिकवर

ABOUT THE AUTHOR

...view details