बीड : आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी काही जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तर काही जणांनी मात्र अर्ज मागे घेतले नाहीत. यामध्ये बीड विधानसभा मतदारसंघात दिवंगत लोकनेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप हे देखील निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.
यांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे : कुंडलिक खांडे निवडणूक लढण्यावर ठाम असून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर महायुतीचे योगेश क्षिरसागर आणि महाविकास आघाडीचे संदीप क्षिरसागर यांच्यात ही प्रमुख लढत होणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र जरांगे पाटील यांनी कुठलाही उमेदवार देणार नसल्याचं स्पष्ट केल्यामुळं आता ही निवडणूक कशी होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
प्रकाश सोळुंके आणि मोहन जगताप रिंगणात : परळी विधानसभा मतदारसंघात राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि महाविकास आघाडीचे राजेसाहेब देशमुख यांच्यात ही प्रमुख लढत होणार आहे. त्याचबरोबर माजलगाव मतदारसंघात महायुतीचे प्रकाश सोळुंके आणि महाविकास आघाडीचे मोहन जगताप यांच्यात ही लढत होणार आहे. तर आष्टी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपाच्या कमळ या चिन्हावर सुरेश धस तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून बाळासाहेब आजबे तर अपक्ष उमेदवार म्हणून माजी आमदार भीमराव धोंडे हे निवडणूक लढण्यावर काम आहेत.
'या' मतदारसंघात अशी होणार लढत :गेवराई विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजय सिंह पंडित तर शिवसेना (उबाठा) उमेदवार बदामराव पंडित, मनसे उमेदवार मयुरी खेडकर तर अपक्ष उमेदवार विद्यमान आमदार लक्ष्मण पवार हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर केज विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार नमिता मुंदडा तर महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्यात ही लढत होणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
कोणी घेतली माघार तर कोण लढणार निवडणूक पाहा
1- बीड विधानसभा मतदारसंघातून जयदत्त क्षीरसागर यांची निवडणुकीतून माघार
2- भाजपाचे बंडखोर माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांची बीड विधानसभा निवडणुकीतून माघार
3- माजी मंत्री सुरेश नवले यांची बीड विधानसभा निवडणुकीतून माघार
4- शिवसंग्रामच्या अध्यक्ष ज्योती विनायकराव मेटे या निवडणूक लढवण्यावर ठाम
5- शिंदेंच्या शिवसेनेचे बीड जिल्हाध्यक्ष अनिल जगताप बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम
6- बीडच्या परळी मतदारसंघातून राजाभाऊ फड यांची विधानसभा निवडणुकीतून माघार
7- बीडच्या केज मतदारसंघातून माजी आमदार संगीता ठोंबरे यांची निवडणूक रिंगणातून माघार
8- बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघातून भाजपामधून बंडखोरी केलेले भीमराव धोंडे अपक्ष निवडणूक लढविण्यावर ठाम
9- बीडच्या गेवराई मतदारसंघातून आमदार लक्ष्मण पवार अपक्ष निवडणूक लढविण्यावर ठाम
हेही वाचा -
- मनोज जरांगे पाटील विधानसभेला उमेदवार देणार की पाडणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेण्याचं कारण काय? फायदा कुणाला मविआ की महायुतीला?
- अमित ठाकरेंचं टेन्शन वाढलं; सदा सरवणकर निवडणूक लढवणार, सांगितलं 'हे' कारण