मुंबई-येत्या काही दिवसांतविधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात दिल्लीतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. महायुतीतील घटकपक्ष मतदारांना आकर्षित करण्याच्या हेतूने सरकारच्या माध्यमातून जनतेसाठीच्या निर्णयाचा सपाटा लावत आहेत. महायुतीत जागावाटपात एकमत नसल्याचेदेखील बोललं जातंय, तर दुसरीकडे बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार लढणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. अजित पवार बारामतीतून निवडणूक लढणार की नाही यावर आता चर्चा रंगू लागल्या आहेत.
पवारांच्या पक्षाचा महायुतीला फायदा नाही: महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेसोबत जाऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं, खरं तर याचं श्रेयसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनाच दिलं जातं. महाविकास आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोल शरद पवारांकडे असल्याचं बोललं जातं होतं. परंतु राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप झाला आणि शिवसेना पक्ष फुटून भाजपासोबत जाऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवारदेखील महायुतीच्या सत्तेत सहभागी झाले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने आपकी बार 400 पारचा नारा देत स्वबळावर केंद्रात सत्ता स्थापन करणार असल्याचं सांगितलंय. मात्र भाजपाला मित्र पक्षांचा आधार घेऊन सत्ता स्थापन करावी लागलीय. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीतील देशाचे लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागले होते. सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करून बारामतीवर शरद पवारांचं वर्चस्व असल्याचं दाखवून दिलंय. तसेच महाराष्ट्रात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेतल्याने त्यांना कोणताच फायदा झाला नसल्याचं उघड उघड भाजपा आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून बोललं जात होतं. आता बारामतीतून अजित पवार निवडणुकीला सामोरे जाणार की कुटुंबातील दुसरे कोणी उमेदवार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. गुरुवारी बारामतीतील कार्यक्रमात अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढणार नसल्याचे संकेत दिलेत, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात.
अजित पवार पळ काढताय - देसाई :उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतून निवडणूक न लढण्याच्या संकेतावर बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई म्हणाले की, बारामती मतदारसंघातून सात ते आठ वेळा विजयी झालेले अजित पवार यावेळी थोडे साशंक आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातून पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभं करणे चूक असल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीररीत्या व्यक्त केलं होतं, सुनेत्रा पवारांना निवडणुकीच्या रिंगण्यात उतरवण्याचा दबाव हा अजित पवारांवर भाजपाकडून टाकण्यात आल्याचंही आता बोललं जातंय. परंतु अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा मोठ्या फरकानं पराभव झाला. आता विधानसभा निवडणुकीतही असा लाजिरवाणा पराभव होऊ नये, म्हणून अजित पवारांना आतापासूनचं माघार घेतल्याचे हेमंत देसाई सांगतात. गेल्या काही दिवसांपासून बारामती आणि जामखेड मतदारसंघामध्ये जय आणि पार्थ पवार यांचे दौरे वाढल्याचे दिसत आहे, त्यामुळे त्यांच्यापैकी एक जण बारामतीमधून उभा राहण्याची शक्यता आहे किंवा अजित पवारांच्या जवळची एखादी व्यक्ती उभी राहू शकते. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांचा पराभव झाला तर त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बलस्थानाला धक्का लागू शकतो आणि अजित पवारांसाठी ही सर्वात मोठी नामुष्की होऊ शकते, त्यासाठी अजित पवारांनी यातून मार्ग म्हणून विधानसभा निवडणूक लढण्याचं किंवा स्वतःला दूर ठेवून एक प्रकारे पळ काढण्याचा प्रयत्न असू शकतो, असंही हेमंत देसाई यांनी म्हटलं आहे.
अजित पवार निवडणूक लढवणार - चव्हाण : अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहे. महायुतीतील घटक पक्षांनी युतीधर्म पाळायचं ठरवलेलं असून, सध्या महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही विधानसभेच्या जागेचा उमेदवार घोषित करू शकत नाहीत. मात्र बारामतीतून आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणूक लढवतील, असा विश्वास पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
अजित पवारांचं भावनिक आवाहन आहे- तपासे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, अजित पवारांचे संकेत आहेत, मात्र ज्याप्रकारे सर्व्हे येत आहेत, त्यामध्ये राज्यात महाविकास आघाडी सत्ता स्थापन करेल, अशा प्रकारची परिस्थिती आहे. महायुतीत अजित पवारांना वारंवार डावललं गेलं आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांना वाटलं होतं की, आपण आपल्या जास्तीत जास्त जागा निवडून आणू, मात्र तसं न घडता उलट शरद पवारांचं वर्चस्व सिद्ध झालं. अजित पवारांना बारामतीकरांना भावनिक साद घातल्याचं महेश तपासे यांनी म्हटलं आहे. जेव्हा जेव्हा अटीतटीचा सामना होण्याची शक्यता निर्माण होत असते, त्यावेळेस पक्षप्रमुख किंवा पक्षातील प्रमुख नेत्यांकडून जनतेला भावनिक साद घालत निवडून देण्याचे आवाहन केलं जातं. अजित पवारांकडून देखील अशाच प्रकारे भावनिक कार्ड खेळलं जातं असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी नवी खेळी करत असल्याच्याही चर्चा आता रंगू लागल्या आहेत.