वर्धा Wardha Loksabha 2024 : कधीकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून वर्धा लोकसभा मतदारसंघ ओळखला जायचा. पण आज इथं भारतीय जनता पक्षाचं प्राबल्य आहे. वर्धाचे विद्यमान खासदार रामदास तडस हे भाजपाचे नेते असून ते सलग दोन वेळा इथून निवडून आले आहेत. रामदास तडस यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळण्याच्या बाबत जरा साशंकता आहे. मागील 2019 च्या निवडणुकीत त्यांनी चारुलता टोकस यांना पराभूत केलं होतं. यंदा भाजपा इथून नवीन उमेदवार देण्याची शक्यता आहे.
दिग्गजांनी केलं प्रतिनिधित्व : 1952 साली हा मतदारसंघ अस्तित्वात आला होता. तेव्हा पहिले खासदार म्हणून काँग्रेसचे श्रीमन अग्रवाल निवडून आले होते. त्यानंतर सलग तीन वेळा कमल नयन बजाज वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर वसंत साठे यांनी देखील तीन टर्म वर्धा लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे रामचंद्र घंगारे यांनी वसंत साठे यांची घोडदौड रोखली होती. प्रभा राव, दत्ता मेघे, सुरेश वाघमारे यांनीही आतापर्यंत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं.
वर्धा लोकसभेची रचना : वर्धा जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात वर्धा, हिंगणघाट, आर्वी व देवळी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तसंच अमरावती जिल्ह्यातील धामणगाव व मोर्शी विधानसभाही वर्धा लोकसभा क्षेत्रात येतात. वर्धा जिल्ह्यात तेली समाजातील मतदारांचं सर्वाधिक प्राबल्य आहे. तसंच कुणबी मतदार देखील निर्णायक भूमिका बजाऊ शकतात. जिल्ह्यात 16 लाख मतदार आहेत. जिल्ह्यातील 4 पैकी 3 विधानसभा मतदारसंघांवर भाजपाचं वर्चस्व आहे. वर्धा, हिंगणघाट आणि आर्वी या मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत तर देवळी मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहे.
वर्धा शहराची ऐतिहासिक ओळख : वर्धा या शहराचं नाव 'वरदा' नदीच्या नावावरुन पडलं आहे. पूर्वीच्या काळातील 'वरदा' नदी ही आज 'वर्धा' नदी नावानं ओळखली जाते. वर्धा शहराला फार मोठा प्रगल्भ इतिहास लाभलाय. ब्रिटीशांच्या काळात म्हणजे 1862 पर्यंत वर्धा शहर नागपूरचा एक भाग होता. मात्र त्यानंतर प्रशासकीय कारणानं वर्धा वेगळा करण्यात आला. पुलगाव जवळील कवठा इथं वर्ध्याचं जिल्हा मुख्यालय उभारण्यात आलं. पण नंतर 1966 मध्ये वर्धा हे पालकवाडी जवळ वसविण्यात आलं. स्वातंत्र्य लढ्यात वर्ध्याचं महत्व फार होतं. महात्मा गांधी यांनी वर्ध्यातूनचं स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली होती. तर 1951 साली गांधी यांचे शिष्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली होती. या चळवळीला रक्तहीन क्रांती म्हणून ओळखलं जातं.
वर्धा महात्मा गांधीची कर्मभूमी : वर्धा लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे. कारण वर्धा नावाच्या अवती-भवती राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाचं वलय आहे. वर्धा महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. 1940 साली गांधीजींनी वर्धा शहराच्या अगदी लगत असलेल्या सेगाव या गावाचं नामकरण सेवाग्राम असं केलं होतं. तेव्हा पासूनच वर्धा शहराचं नाव इतिहासाच्या पानात अमर झालं असं म्हटल्यास वावगं ठरु नये. आजही वर्धेच्या सेवाग्राम येथे 'महात्मा गांधी' यांचा आश्रम अगदी दिमाखात उभा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सेवाग्राम आश्रम भारताच्या स्वातंत्र्य संग्राम चळवळीचं केंद्र बनला होता. या ठिकाणी आजही त्या काळातील आठवणींच्या पाऊलखुणा शाबूत आहेत.