चंद्रपूर Chandrapur Lok Sabha : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आज (19 एप्रिल) 55.11 टक्के मतदान झालं. दरम्यान, चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण 15 उमेदवार असून भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात मुख्य लढत आहे.
शिक्षक आमदार सुधाकर अडबाले चंद्रपूर-वणी-आर्णी या लोकसभा मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील 4 विधानसभा आणि यवतमाळ जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर, वरोरा आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी, आर्णी या विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीकरिता सकाळी 7 ते दुपारी 5 या वेळेत 55.11 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात राजूरा विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 59.14 टक्के, तर सर्वात कमी 48.20 टक्के मतदान चंद्रपूर मतदार संघात झाले. बल्लारपूर 59.06, वरोरा 57.56, वणी 58.87, तर आर्णी विधानसभा मतदारसंघात 49.70 टक्के मतदान झाले.
शिक्षक आमदारांचं सपत्निक मतादन : मतदानाला सुरुवात होताच शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावणारं हे पहिलंच दाम्पत्य ठरलं.
अनेक मतदार मतदानापासून वंचित :2024 च्या लोकसभा निवडणुकीत 24 हजार नवमतदारांची भर पडली असतानाही मतदानाची टक्केवारी मात्र घटली असल्याचं समोर आलंय. सायंकाळी 5 वाजेपर्यंत केवळ 55.11 टक्के इतकेच मतदान होऊ शकलं, तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 64.84 टक्के इतके मतदान झालं होतं. यातील महत्त्वाचं कारण म्हणजे अनेक मतदारांची नावं मतदार यादीत नसल्याचं समोर आलं. प्रियदर्शनी शाळा, बजाज शाळा, घोडपेठ अशा अनेक मतदान केंद्रात वर्षानुवर्षे मतदान करणाऱ्यांची नावंच यादीत नसल्यानं मतदान केंद्रांवर तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं जिल्हा निवडणूक व्यवस्थापनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
हेही वाचा -
- जगातील सर्वात लहान महिला ज्योती आमगेंनी बजावला मतदानाचा हक्क, नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन - Lok Sabha Election 2024
- बापरे! मतदान केंद्रात निघाला विषारी साप, मतदार गोंधळले - Lok Sabha Election 2024
- निवडणूक आयोगाचा अनोखा उपक्रम! विशिष्ट थीमवर तयार केले मतदान केंद्र, पाहा व्हिडिओ - Theme Voting Center