महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा पराभव करण्याकरिता महायुतीची रणनीती, मनसेसह अमोल मिटकरींचा होणार सामना? - Vidhan Sabha Elections 2024 - VIDHAN SABHA ELECTIONS 2024

Worli Seat Controversy : वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध महायुती सरसावली आहे. त्यामुळं या मतदारसंघातून महायुती कोणता उमेदवार देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

Vidhan Sabha Elections 2024 Aaditya Thackeray Worli Seat Controversy Mahavikas Aghadi Vs Mahayuti Maharashtra Politics
संदीप देशपांडे, आदित्य ठाकरे, अमोल मिटकरी (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 26, 2024, 4:53 PM IST

मुंबई Worli Seat Controversy : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विरोधात लढण्यासाठी महायुतीसह मनसेनंही कंबर कसलीय. त्यामुळं आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तगडा उमेदवार कोण असेल? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. मात्र, असं असतानाच मनसेचे संदीप देशपांडे आणि राष्ट्रवादीकडून ( अजित पवार गट) अमोल मिटकरी मैदानात उतरणार असल्याचं बोललं जातंय. पण असं झालं तर याचा फायदा आदित्य ठाकरे यांनाच होण्याची शक्यता आहे. त्यामुळं महायुती काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

राज ठाकरे यांचे विश्वासू संदीप देशपांडे :2019 साली आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि ती जिंकली. आदित्य हे ठाकरे घराण्यातून निवडणूक लढविणारे व्यक्ती आहेत. आदित्य ठाकरे यांनी वरळीमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश माने यांचा 67,427 मतांनी पराभव केला होता. परंतु, आता सध्याची राजकीय परिस्थिती बघता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना राज्यभरात रंगणार आहे. त्यातच मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे विरोधात महायुतीकडून तगडा उमेदवार देण्याची शर्यत लागली आहे. राज ठाकरे यांच्या मनसेनं वरळीमधून मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या नावाची घोषणा केली आहे. संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सरदार म्हणून ओळखले जातात. आपल्या पक्षाची भूमिका ते सातत्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतात. त्यानंतर आता देशपांडे यांना राज ठाकरेंकडून ग्रीन सिग्नल भेटल्यानंतर त्यांनी वरळी विधानसभा क्षेत्रात बॅनर लावून शक्तीप्रदर्शन सुरू केलंय. वरळी विधानसभा मतदारसंघात मनसेचं 36 ते 38 हजार मताधिक्य आहे.

अजित पवारांचे पुन्हा घड्याळ : वरळीत विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर संभाव्य उमेदवार म्हणून अमोल मिटकरी यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना सचिन अहिर यांनी या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केलं होतं. आता त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षात जरी प्रवेश केला असला तरीसुद्धा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मुंबईत आपली ताकद वाढवण्याची रणनीती आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वरळीमधून अमोल मिटकरी यांना मैदानात उतरवलं जाणार आहे.

मनसे विरुद्ध अमोल मिटकरी... यांच्यात 36 चा आकडा : एकीकडे विधानसभेला आदित्य ठाकरे विरोधात मनसेने संदीप देशपांडे यांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली असताना दुसरीकडे अजित पवार गटाकडून अमोल मिटकरी हे संभाव्य उमेदवार असणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये मनसे आणि अमोल मिटकरी यांचा काही दिवसापूर्वी झालेला राडा संपूर्ण महाराष्ट्रानं पहिला आहे. अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला मनसैनिकांनी अमोल मिटकरींची गाडी फोडत उत्तर दिलं होतं. अशा परिस्थितीत दोघांच्या लढाईत आदित्य ठाकरे यांना फायदा होईल, असं मत राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी व्यक्त केलं आहे. जयंत माईणकर यांनी म्हटले," वरळी मतदारसंघ हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. 1990, 1995, 1999 आणि 2004 अशाप्रकारे सलग चार वेळा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. याकरताच 2019 रोजी हा मतदारसंघ शिवसेनेला अतिशय सुरक्षित वाटत असल्याकारणानं आदित्य ठाकरे यांची या मतदारसंघातून निवड करण्यात आली होती. आता जरी राजकीय समीकरण बदलली असतील दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस झाले असतील तरीसुद्धा स्थानिक स्तरावर पक्षाला असलेला जनाधार फार महत्त्वाचा आहे. अशातच जर संदीप देशपांडे विरुद्ध अमोल मिटकरी असा सामना इथे झाला, तर त्याचा फायदा नक्कीच आदित्य ठाकरे यांना होईल."


आदित्य ठाकरेंसाठी लढाई सोपी नाही :लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत यांचा 52 हजार 673 मतांनी विजय झाला होता. असे असले तरी आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघातून त्यांना फक्त 6 हजार 750 इतकंच मताधिक्य भेटलंय. वरळी मतदारसंघातून अरविंद सावंत यांना 64 हजार 844 मतं मिळाली. तर महायुतीच्या शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांना 58 हजार 129 मतं मिळाली. त्यामुळं आदित्य ठाकरे यांच्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाचं घटलेलं मताधिक्य ही धोक्याची घंटा आहे.

भाजपाकडूनदेखील उमेदवाराची तयारी : वरळी मतदारसंघाच्या या लढाईत भाजपानंही उडी घेतल्याचं बघायला मिळतंय. मागील चार वर्षांमध्ये आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात प्रत्येक सण उत्सवाचं आयोजन भाजपाकडून मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलंय. आताही भाजपाकडून दहीहंडीचा मोठा उत्सव वरळीच्या जांभोरी मैदानामध्ये आयोजित करण्यात आलाय. अफजलखानाचा वध अशा आशयाचा मनोरा इथं रचला जाणार आहे. त्यामधून नक्कीच ठाकरे घराण्यावर निशाणा साधला जाणार आहे. तसंच आदित्य ठाकरेंविरोधात भाजपा आपला उमेदवार देण्याची दाट शक्यता आहे. यासाठी आशिष शेलार यांनी कंबर कसली असून सध्याच्या राजकीय परिस्थितीचा ते आढावा घेत आहेत.

हेही वाचा -

  1. महाविकास आघाडीच्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा; ठाकरेंचा "एवढ्या" जागांवर दावा? - Maha Vikas Aghadi Seat Sharing
  2. विधानसभेसाठी चंद्रकांत पाटलांना पक्षातूनच विरोध; 'या' नेत्यानं दिलं आव्हान - Kothrud Assembly Election 2024
  3. महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र, देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची घेतली भेट - Maharashtra politics

ABOUT THE AUTHOR

...view details