मुंबई Vidhan Sabha Election 2024 : बदलापूर अत्याचार आणि मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलंय. तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं जोरदार तयारी सुरू केलीय. महाविकास आघाडीकडून जागावाटप आणि उमेदवारांच्या चाचण्यांबाबत बैठका सुरू आहेत. उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला लोकसभा निवडणुकीत नवसंजीवनी मिळाली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची उद्धव ठाकरे यांनी मागणी केली, मात्र काँग्रेस आणि शरद पवार यांनी याबाबत सावध भूमिका घेतलीय.
माजी खासदार आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी उद्धव ठाकरेंबाबत मोठं वक्तव्य केलं. "उद्धव ठाकरे महायुतीतून बाहेर पडल्यानं युतीचं मोठं नुकसान झालं." असं रावसाहेब दानवे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षाची बार्गेनिंग पॉवर वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षानं आतापासूनच विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. ठाकरेंकडून विधानसभा निवडणुकीसाठी अधिक जागांची मागणी होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळातून होत आहे. याची नेमकी कारणं काय आहेत? यावर एक नजर टाकू.
ज्यांचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री :गेल्या महिन्यात मुंबईत महाविकास आघाडीची बैठक झाली. यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरचंद्र पवार) आणि काँग्रेसला महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याचं जाहीर आवाहन केलं. मात्र, काँग्रेस आणि शरद पवार यांनी याबाबत सावध भूमिका घेतली. यानंतर शरद पवार यांनी उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं नेतृत्व आहे, असं सांगितलं. मात्र, मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत बोलताना पवारांनी 'ज्या पक्षाचे आमदार जास्त असतील, त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल', असं सूचक विधान केलं. दुसरीकडे काँग्रेसनं देखील आमदार जास्त त्याच पक्षाचा मुख्यमंत्री असेल असं स्पष्ट केलं. परंतु लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळाल्यामुळं आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकतो, असा आत्मविश्वास उद्धव ठाकरेंना आहे. मात्र, ठाकरेंना मित्रपक्षांकडून हिरवा कंदील मिळत नसल्यानं महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ सुरू असल्याचं चित्र आहे. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचं सूत्र अशी खेळीही शरद पवार खेळू शकतात, असंही तज्ञ आणि राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
ठाकरेंमुळं नवसंजीवनी :लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं एकूण 31 जागा जिंकल्या. महायुतीनं 40 प्लसचा नारा दिला होता, मात्र त्यांना 17 जागांवर समाधान मानावं लागलं. महाविकास आघाडीत काँग्रेसचे 13, शिवसेना (ठाकरे) 9 आणि शरद पवारांचे 8 खासदार निवडून आले. त्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला असून, विधानसभा निवडणुकीत आपलंच सरकार येणार असल्याचा दावा मविआचे नेते करतायत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षाला नवसंजीवनी मिळाल्याची चर्चा आहे. कारण 2019 ला राज्यात काँग्रेसचा 1 खासदार होता, आता 13 खासदार आहेत. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे 8 खासदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यावेळी काही जणांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर काही जणांनी ठाकरेंसोबत कायम राहण्याचं ठरवलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी शरद पवारांसोबत हातमिळवणी केली. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं लोकांमध्ये उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती वाढली. विशेषतः मुस्लिम मतदार उद्धव ठाकरेंकडे वळले. याचा फायदा महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत झाला. उद्धव ठाकरेंबद्दलच्या सहानुभूतीचा फायदा काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षाला झाला.