मुंबईAmit Shah Mumbai Visit :- येत्या ८ ते १० दिवसांत विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता असून, राज्यात भाजपाने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने महिन्याभरात राज्यात दोन दौरे करणारे अमित शाह १ ऑक्टोबरला पुन्हा मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते मुंबई आणि नवी मुंबईत सभा घेणार असून, मुंबई तसेच कोकणातील विधानसभा जागांचा आढावा घेणार आहेत.
महिन्याभरातील तिसरा दौरा :मागील काही दिवसांत विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आता १ ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबईतील दादर येथील योगी सभागृहात अमित शहा दुपारी १ वाजता मुंबईतील सर्व ३६ विधानसभा मतदारसंघांतील प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांच्यासोबत संवाद साधणार आहेत. विधानसभा निवडणुकीपाठोपाठ मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाही होऊ घातलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये विधानसभेबरोबरच महापालिकेची मोहीम फत्ते करण्यासाठी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आराखडा तयार केला गेला असून, याबाबत सविस्तर माहिती अमित शाह यांना देण्यात येणार आहे. यासोबतच ठाणे आणि कोकणात भाजपाची काय परिस्थिती आहे? याचाही आढावा घेतला जाणार आहे. यानंतर सायंकाळी ४ वाजता अमित शाह हे सिडको कन्व्हेक्शन सेंटर, नवी मुंबई येथे कार्यकर्ते आणि नेते यांच्याशी संवाद साधणार आहेत.
विद्यमान खासदारांचं तिकीट कापल्याने बसला होता फटका : मुंबईतील एकूण ६ लोकसभा जागांपैकी आता झालेल्या निवडणुकीत भाजपाला फक्त उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघावर विजय संपादन करता आला होता. यासोबतच ठाण्यात आणि कोकणातही भाजपाला हवं तसं यश संपादन करता आलेलं नाही. विशेष म्हणजे पितृपक्षानंतर महायुतीकडून जागावाटप घोषित होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये मुंबईतील अनेक मतदारसंघांमध्ये भाजपाकडून इच्छुक उमेदवारांची यादी मोठी आहे. निवडणुकीत निवडून येण्याचा निकष या मुद्द्यावर प्रामुख्याने उमेदवारी दिली जाणार असली तरीसुद्धा आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने यंदा त्यांच्या विद्यमान मनोज कोटक, गोपाळ शेट्टी, पूनम महाजन या तिन्ही खासदारांचं तिकीट कापलं होतं. या कारणाने सुद्धा अनेक मतदारसंघांमध्ये नाराजी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सत्ता काबीज करणे इतकं सोपं नसल्याने अमित शाह नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कुठला कानमंत्र देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचाः