मुंबई Uddhav Thackeray On BJP : भाजपाचे माजी मुंबई उपाध्यक्ष दिलीप माने यांनी रविवारी (11 फेब्रुवारी) आपल्या कार्यकर्त्यांसह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिलीप माने यांना शिवबंधन बांधून तसंच त्यांच्या हातात भगवा देऊन त्यांचं पक्षात स्वागत केलं. त्यानंतर बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपावर कडाडून टीका केली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे : यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "शिवसेना फुटीनंतर काही लोकांना असं वाटलं होतं की, उद्धव ठाकरे एकटा पडेलय पण उद्धव ठाकरे एकटा नाही तर त्याच्यासोबत अनेकजण आहेत. हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय. उलट आपली ताकद शतपटीनं नाही तर सहस्त्रपटीनं वाढत आहे. दिलीप माने आज आपण शिवसेनेत आला आहात. आपल्याला खूप शुभेच्छा आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची आम्ही उघडपणे आघाडी केली होती. पण आता राष्ट्रवादीचं काय झालंय हे सर्व पाहत आहोत. भारतीय जनता पार्टीनं याच मातोश्रीवरती जे आश्वासन दिलं होतं, ते मोडलं. त्यांना मला युतीतून बाहेर काढायचं होतं. म्हणून त्यांनी ते केलं. म्हणून भाजपाला धडा शिकवण्यासाठी आपण एकत्र आलो आणि आघाडी केली", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
सत्तांतर हाच भाजपाचा धर्म :पुढं ते म्हणाले की, "भाजपासाठी धर्म आणि माणुसकी वगैरे काही नाही. सत्तांतर हाच त्यांचा धर्म आहे. दडपशाही आणि हुकूमशाही वाढली असून त्या हुकूमशाहीला उलथवून लावण्यासाठी आपण लढा देत आहोत. या लढ्यात आता तुमचादेखील आम्हाला पाठिंबा मिळालाय. आज तुम्ही सर्व समाजातील लोकांना एकत्र घेऊन आला आहात. आपण सर्व जाती आणि धर्मातील लोकांना एकत्र येऊन देश वाचवला पाहिजे. जी हुकूमशाही सुरू आहे ती थांबवून देश वाचवला पाहिजे. कारण देश वाचला तर आपण वाचू." तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाच्या मार्गानं आपण चालायला हवं. देशात लोकशाही जिवंत राहण्यासाठी जात, पंथ आणि धर्म हे विसरून सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
...ही माझ्यासाठी मोठी संधी :या प्रवेशानंतर बोलताना दिलीप माने म्हणाले की, "आज मला शिवसेनेत (ठाकरे गटात) पक्ष प्रवेश मिळाला ही माझ्यासाठी मोठी संधी आहे. माझ्यासोबत विविध समाजातील तीन हजार लोक आले आहेत. यामध्ये बंजारा, मातंग आणि चर्मकार समाजातील लोकांचा समावेश आहे. सध्या राज्यातील राजकीय वातावरण अस्थिर आणि गढूळ झालंय. यामध्ये उद्धव ठाकरे एकाकी लढा देत आहेत. ते महाराष्ट्राची अस्मिता वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यामुळं त्यांना साथ देण्यासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश केलाय."
हेही वाचा -
- भाजपाची हुकूमशाही आता उलथून लावायची, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
- "राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का?", उद्धव ठाकरे आक्रमक; राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी
- भाजपाकडून उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार, बावनकुळे, शेलार यांची ट्विटद्वारे टीका