मुंबई Uddhav Thackarey : आज प्रचाराचा शेवटचा दिवस असताना, महायुती आणि महाविकास आघाडीनं जोरदार प्रचार केल्याचं चित्र आहे. पैसे पकडणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्तांना सोडून दिलं जातं आणि आमच्या शिवसैनिकांवर लाठीचार्ज केला जातो. महिलांना मारहाण केली जाते. त्या पोलिसांची नावं मला पाहिजे, हे सरकार लवकरच जाणार असून उद्या तुमचं काय करायचं हा निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही. आमच्याशी मस्तीत वागाल तर त्यांची मस्ती कशी जिरवायची, हे आमच्या शिवसैनिकांना चांगलं माहीत आहे, असा घणाघात शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरेंनी केला. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रथारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते.
ही विजयाची सभा : पुढं बोलताना ठाकरे म्हणाले की, "ही प्रचाराची सभा नसून विजयाची सभा आहे. आता आपल्या अच्छे दिनची सुरवात 4 जूनपासून होणार आहे. आतापर्यंत या सत्ताधाऱ्यांनी शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग केला. भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्या व्यक्तीला बदनाम करायचे त्यानंतर आपल्या पक्षात घ्यायचे. मग त्याचा सन्मान करायचा. असंच आतापर्यंत भाजपा करत आलाय. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, हे यांना बघवत नाही. म्हणून हे महाराष्ट्राला बदनाम करतात, लुटालुट करतात त्यांना सगळं काही गुजरातला घेऊन जायचं आहे. मात्र आपलं सरकार ही लूट होऊ देणार नाही. महाराष्ट्राचं वैभव परत मिळवून देणार आहे. जे घेऊन गेले आहे त्यापेक्षा कित्येक पटीनं परत घेऊन येऊ."
आरएसएसला शंभरवं वर्ष धोक्याचं :पंतप्रधान मुंबईत अशा मुख्यमंत्र्यांचा प्रचार करीत आहेत, जे घटनाबाह्य पदावर बसले आहेत. अजूनही न्यायालयात हे प्रकरण चालू आहे. भाजपाचे अध्यक्ष नड्डा म्हणाले की, देशात एकच पक्ष राहणार असून भाजपा हा आता स्वयंभू पक्ष झाला आहे. त्यांना आता आरएसएसची गरज नाही. त्यामुळं आरएसएसला शंभरावं वर्ष धोक्याचं असणार हे नक्की झाल्याचं ठाकरे म्हणाले. मोदी-शाह सारखे लोक संघाला नष्ट करुन टाकतील. ज्यांनी जन्माला घातलं त्यांनाच संपवायला ते निघाले आहेत, असं म्हणत ठाकरेंनी मोदींवर टीका केलीय.