पुणे Murlidhar Mohol : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचं (Lok Sabha Elections) वारं वाहू लागलंय. पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) अशी लढत होणार आहे. दोघांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. आजपर्यंत आपण पैलवानांना मैदानात कुस्ती करताना पाहिलं. पण हेच पैलवान आत्ता राजकारणात येत आहेत. पुणे शहरातील तसेच जिल्ह्यातील जवळपास एक हजारहून अधिक पैलवानांनी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा दिलाय. पुढील काळात हे पैलवान मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील देणार पाठिंबा : पुणे शहरातील कोथरूड येथे शनिवारी एक हजारहून अधिक पैलवान एकत्र येत मेळावा घेतला. या मेळाव्यात मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा देण्याचं ठरलं आहे. मेळाव्याबाबत मुरलीधर मोहोळ म्हणाले की, "पुणे शहराची एक संस्कृती आहे. पुणे शहर तसेच जिल्ह्यानं कुस्ती या खेळात एक वेगळं स्थान तयार केलं आहे. मी देखील एक पैलवान आहे. जिथं मी सराव केला अशा या लाल मातीशी निगडित असलेले हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील उपस्थित होते. आम्हाला लाल मातीतील ऋणानुबंध टिकवायचे आहेत. म्हणून आजच्या नियोजनाच्या बैठकीत एक हजार पैलवानांनी पाठिंबा दिला. तसेच पुढील नियोजन त्यांच्या पद्धतीनं करणार आहेत."