बुलढाणा Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (4 एप्रिल) निवडणूक अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती. महाविकास आघाडीच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी आपला अर्ज दाखल केला. त्याकरता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज बुलढाण्यात आले होते. अर्ज भरल्यानंतर आयोजित केलेल्या सभेमध्ये आदित्य ठाकरेंनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं.
काय म्हणाले आदित्य ठाकरे : यावेळी बोलत असताना आदित्य ठाकरे म्हणाले की, "तापमान जसं वाढत चाललंय मी कार्यकर्त्यांना विनंती करेन की प्रचार करत असताना पाणी पीत जा, डोक्यावर रुमाल घेत जा आणि स्वतःची काळजी घेत जा. कारण तुम्ही तुमची काळजी घेतली तरच तुम्ही देशाची आणि जिल्ह्याची काळजी घेऊ शकाल." तसंच आज मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित आहेत. मात्र, आज या राज्यात महिला सुरक्षित आहेत का? मंत्रिमंडळात एका जणानं सुप्रिया सुळेंना कॅमेऱ्यासमोर शिवीगाळ केली. अशा मंत्र्यांना खरं तर गेट आउट करून काढून टाकायला पाहिजे होतं. मात्र, तसं झालं नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.