अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नणंद-भावजयांचा प्रचार सुरु पुणे Supriya vs Sunetra : बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा पवारांच्या घरातच नणंद-भावजय यांच्यात लढत होत आहे. यामुळं या मतदारसंघाकडे सर्व देशाचं लक्ष लागलंय. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं खासदार सुप्रिया सुळे तर राष्ट्रावादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षानं अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिलीय. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज पहिल्याच दिवशी दोन्ही उमेदवारांनी अधिकृत प्रचाराला सुरुवात केलीय. सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे : यावेळी पुण्यात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "भाजपाला आमच्या घरातील उमेदवार फोडून द्यावा लागतो. त्यांच्याकडे उमेदवारसुद्धा नाही. मोठ्या भावाची बायको ही आई समान असते. आमच्या आईला घर फोडून त्यांनी उमेदवारी दिली." तसंच मी 'इंडिया' आघाडीचे आभार मानते. त्यांनी पुन्हा एकदा लोकसभेची मला संधी दिली. बारामती लोकसभा मतदारसंघाचे आभार मानते. पुन्हा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून द्या," अशी विनंतीही त्यांनी केली.
मी वयक्तिक टीका करणार नाही : तुमची लढाई तुमच्या वहिनी सोबत आहे. यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "माझ्यासाठी वैचारिक लढाई कुठल्याही व्यक्तीशी नाही. मी वैयक्तिक टीका केलेली नाही. माझ्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत. त्यामुळं ही व्यक्तीकेंद्रित नाही तर विचारकेंद्रित लढाई आहे. विकासाची लढाई आहे. त्यामुळं मी कधीही वैयक्तिक टीका कुणावर करणार नाही. व्यक्ती केंद्रित तर कधीच करणार नाही. तसंच महागाई, बेरोजगारी, दडपशाही विरोधात माझी लढाई आहे," असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
घड्याळ्याला मत म्हणजे विकासाला मत : सुनेत्रा पवार यांनी पुण्यातील बावधन भागात नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी म्हटलं, " 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकासाची दूरदृष्टी धरुन अजित पवार यांनी पाईक होण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं यावेळेस घड्याळ या चिन्हाला मतदान करा. घड्याळाला मतदान म्हणजे विकासाला मतदान आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान आहे. त्यामुळं भरपूर प्रमाणात मतदान करा, असं आवाहन बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी केलंय. तसंच बारामती लोकसभेत महायुतीनं मला उमेदवारी देऊन विश्वास दाखवलेला आहे. हा विश्वास मी स्वार्थ करुन दाखवीन. तुम्ही माझं कौतुक केलं. माझ्याकडून काही अपेक्षासुद्धा व्यक्त केल्या आहेत. त्यासुद्धा मी पूर्ण करेन," असा त्यांनी दावा केला.
हेही वाचा :
- बारामतीत कोणाची दिसणार 'पॉवर'? आतापर्यंत एकहाती वर्चस्व राखलेल्या मतदारसंघात काका-पुतण्यामध्येच प्रतिष्ठेची लढाई - Baramati Lok Sabha Constituency
- बारामतीचं ठरलं! नणंद विरुद्ध भावजय लढत, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर - Supriya VS Sunetra