पुणे :हर्षवर्धन पाटील यांचं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालय. स्वत: हर्षवर्धन पाटील यांनी आज (4 ऑक्टोबर) इंदापुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याची घोषणा केली. मात्र, यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील स्थानिक नेते नाराज असल्याचं बोललं जातय. यावरच आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? : सुप्रिया सुळे या आज पुणे दौऱ्यावर असून यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावर भाष्य केलय. त्या म्हणाल्या, "हर्षवर्धन पाटील यांचं पाटील कुटुंब आणि पवार कुटुंब यांचे सहा दशकांचे संबंध आहेत. त्यामुळं ते पुन्हा आमच्याकडं येत आहेत याचा आनंद होतोय. मधल्या काळात विचारांमध्ये मतभेद झाले होते. मात्र, तरीही आमचे संबंध कायम होते. आमच्यात दुरावा आला पण तो मनाचा नाही तर राजकीय दुरावा होता. मात्र, आता ते परत येत असल्यानं समाधान वाटतंय."
नाराज असलेल्यांची समजूत काढू :पुढं सुप्रिया सुळे म्हणाल्या, "हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देताना इंदापूर तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्यात आली आहे. मात्र, त्यांना उमेदवारी दिल्यामुळं जे नाराज आहेत, त्यांची समजूत काढणं हे आमचं काम आहे. ते आम्ही करू."
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (ETV Bharat Reporter) भारतात टॅलेंटला कमी नाही : बारामतीमधून अजित पवार पक्षाच्या उमेदवारीबाबत सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, "अजित पवारांच्या पक्षानं बारामतीतून कोणाला उमेदवारी द्यायची हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही त्याच्यावर बोलणार नाही. परंतु, आमच्या पक्षांमध्ये सक्षम उमेदवार आहेत. फक्त बारामतीतच नाही तर महाविकास आघाडीमध्ये सर्वच ठिकाणी सक्षम उमेदवार आहेत. आपल्या भारतात टॅलेंटला कमी नाही. संपूर्ण भारतात टॅलेंट आहे. त्यामुळं कुणीही अति आत्मविश्वासात राहू नये", असंही सुळे यावेळी म्हणाल्या.
हेही वाचा -
- केंद्रीय मंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; सुप्रिया सुळे म्हणतात.... - Supriya Sule On Amit Shah
- ‘धर्मवीर 2’ चित्रपटावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, "तुमचा हेतू स्पष्ट असेल तर..." - Supriya Sule
- "राज्याचा गृहमंत्रीच बंदूक घेऊन फिरतोय..."; सुप्रिया सुळेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल - Supriya Sule on Devendra Fadnavis