पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पुण्यातील वडगावशेरी मतदारसंघाचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांच्यावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी जोरदार टीका केली.
एक आई म्हणून सरकारला विचारणार जाब : वडगावशेरी मतदारसंघातील लोहगाव येथे सुनील खांदवे-मास्तर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं. यानंतर झालेल्या कार्यक्रमात सुळे यांनी टिंगरे यांच्यावर टीका केली. कल्याणी नगर येथे झालेल्या पोर्शे कार अपघातावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "वडगावशेरीचे आमदार कुठल्या तोंडानं मतं मागणार? त्यांच्या दोन्ही हातावर खून आहे. हे लोकं गुन्हेगार आहेत आणि म्हणतात मी काही केलं नाही. पोलीस स्टेशन, ससून रुग्णालयात कोणी फोन केले? हे प्रकरण दाबण्याचा कोणी प्रयत्न केला? महाराष्ट्र प्रश्न विचारतोय, मृतांची आई हक्क मागते. पोर्श कार अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांना उत्तर द्यावं लागेल. मी एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही तर, एक आई म्हणून सरकारला जाब विचारते."