पुणे Supriya Sule News :राज्यात एकीकडं लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलंय. तर दुसरीकडं राज्यातील काही भागांमध्ये पाण्याची समस्या भयावह झाली असल्याचं पाहायला मिळतंय. यासंदर्भात बोलत असताना 'बारामतीत देखील दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून आता खासगी टँकर सुरू झाले आहेत', त्यामुळं याकडं सरकारनं लक्ष घालावं', अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? : आज (30 मार्च) पुण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना सुप्रिया सुळे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी पाण्याच्या समस्येसंदर्भात बोसत असताना त्या म्हणाल्या की, "बारामतीत हळू हळू दुष्काळ परिस्थिती निर्माण होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीच्या कामांसाठी प्रायव्हेट टँकर लागत असतील त मग सरकार काय करतंय? माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी इतकं असंवेदनशील होऊ नये. तसंच दुष्काळासंदर्भात मी सातत्यानं ट्विट करत आली आहे. मी संविधानाच्या चौकटीत राहणारी प्रतिनिधी आहे. आचारसंहिता भंग होणार नाही याची मी नेहमी काळजी घेते. माझी नैतिक जबाबदारी आहे की, पाण्याचा प्रश्न सोडवावा. पण दुष्काळाच्या परिस्थितीत ट्रिपल इंजिन सरकार केवळ जागावाटप आणि त्यांच्या वादात व्यस्त आहे", असा आरोपही त्यांनी केला.