महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

उमेदवारी अर्ज भरायला निघालेल्या नवनीत राणांना दिलासा; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द - Navneet Rana - NAVNEET RANA

Navneet Rana : अमरावती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दुसरीकडं सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणाचा निकाल दिलाय. यात त्यांना दिलासा मिळालाय.

Navneet Rana, नवनीत राणा
उमेदवारी अर्ज भरतानाच नवनीत राणाच्या जात प्रमाणपत्रासंदर्भात येणार निकाल; 1000 दिवसांपुर्वी सर्वोच्च न्यायालयानं ठरवलं होतं दोषी

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 4, 2024, 9:15 AM IST

Updated : Apr 4, 2024, 12:10 PM IST

अमरावती Navneet Rana : अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या अमरावतीमधून लोकसभेच्या सलग दोन निवडणुका लढणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्र प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिलाय. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलाय.

काय आहे प्रकरण : अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव असून या मतदारसंघातून नवनीत राणा यांनी 2014 ची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून लढवली होती. त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचे कार्यकर्ते राजू मानकर आणि जयंत वंजारी यांनी जिल्हा जात पडताळणी समिती समोर नवनीत राणा यांना प्रदान करण्यात आलेलं जात वैधता प्रमाणपत्र खोटं असल्यासंदर्भात अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारीवर जिल्हा जात पडताळणी समितीसमोर 19 जानेवारी 2014 रोजी शैक्षणिक अधिकाऱ्यानं दिलेल्या प्रमाणपत्रावरुन नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंग कुंडलेस यांनी सादर केले. मात्र, जात प्रमाणपत्रासाठीचा पुरावा म्हणून सादर केलेले शाळेचे प्रमाणपत्र ज्या तारखेला निर्गमित करण्यात आले, त्या तारखेला शाळा अस्तित्वात नव्हती असं स्पष्ट झालं. नवनीत राणा यांच्या वडिलांचे शाळा सोडण्याचं प्रमाणपत्र हे खोटं आणि बनावट असल्याचं लक्षात येताच जिल्हा जात पडताळणी समितीनं नवनीत राणा यांना नोटीस बजावून त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्यासंदर्भात स्पष्टीकरण मागितलं होतं. यानंतर नवनीत राणा यांनी काही नवीन कागदपत्रे जिल्हा जात वैधता समिती समोर दाखल केली. त्यासोबतच दक्षता विभागाचे अधिकारी बदलून देण्याबाबत तक्रार केली.

शाळाच अस्तित्वात नव्हती-जिल्हा जात पडताळणी समितीनं नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन नव्यानं अहवाल मागविल. त्यानुसार नवीन अहवालात देखील मोची या जातीचा उल्लेख राणा यांच्या शाळा सोडण्याच्या प्रमाणपत्रात काही दिवस अगोदरच म्हणजे शाळा सोडल्याच्या 17 वर्षानंतर करण्यात आला असं स्पष्ट झालं. ज्या काळात नवनीत राणा यांचे वडील शाळेत शिकले असं सांगण्यात आलं, त्यावेळेस ही शाळाच अस्तित्वात नव्हती, असं समितीनं नमूद केलं.

मुंबई उच्च न्यायालयानं ठरवलं दोषी : नवनीत राणा यांच्या जात पडताळणी संदर्भात अस्तित्वात नसलेल्या शाळेचा दाखला, महाविद्यालयातील कागदपत्रांमध्ये केलेली फेरफार यासह रेशन कार्ड मध्ये बदलण्यात आलेली नावं अशा सर्व प्रकारासंदर्भात उच्च न्यायालयानं परखड शब्दात ताशेरे ओढले आहेत. नवनीत राणा यांनी खोट्या आणि नकली दस्ताऐवजांच्या आधारे मिळवलेलं जात प्रमाणपत्र हा फक्त जात पडताळणी समिती सोबत केलेला धोका नसून संपूर्ण संविधानाला दिलेला धोका आहे. अशा परिस्थितीत न्यायालय फक्त बघायची भूमिका नक्कीच घेऊ शकत नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयानं मत मांडत नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र खोटे असल्यासंदर्भातचा 8 जुलै 2021 ला निकाल दिला.

आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष : अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्या जात प्रमाणपत्रासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार असल्यामुळं या निकालाबाबत अमरावतीकरांची उत्कंठा वाढलीय. सर्वोच्च न्यायालयाचा आज निकाल येणार असल्यामुळं अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या अधिकृत उमेदवार नवनीत राणा या अंबादेवी मंदिरात महाआरतीसाठी सकाळीच पोहोचल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा आज निकाल असल्यामुळं राणा दाम्पत्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचं टेन्शनदेखील वाढलंय.

हेही वाचा :

  1. लोकसभेच्या आठ जागांकरिता अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस, काय आहे राज्यातील स्थिती? - Lok Sabha election 2024
  2. "प्रचाराच्या पोस्टरवरुन माझा फोटो काढा अन्यथा...", नवनीत राणांविरोधात महायुतीतील अजून एक नेता आक्रमक - Amravati Lok Sabha Constituency
Last Updated : Apr 4, 2024, 12:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details