महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

निवडणुकीच्या तोंडावर महायुतीकडून योजना आणि घोषणांचा पाऊस, केंद्र सरकारच्या योजनेचा महाराष्ट्रातच शुभारंभ का? - Vidhan Sabha Election 2024 - VIDHAN SABHA ELECTION 2024

Vidhan Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. तर महायुतीकडून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध योजना आणि घोषणांचा (Mahayuti Scheme) पाऊस होताना पाहायास मिळत आहे, असा आरोप विरोधकांनी केलाय.

Mahayuti Government
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस,अजित पवार (संग्रहित छायाचित्र)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2024, 10:41 PM IST

मुंबई Vidhan Sabha Election 2024 :आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) सर्वच राजकीय पक्षाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागा वाटपाबाबत युद्धपातळीवर चर्चा सुरू असताना, आता राज्यात नवी तिसरी आघाडीही राजकीय मैदानाच्या रणांगणात उतरली आहे. त्यामुळं विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार यात शंका नाही.

विधानसभा निवडणुकीसाठी कसली कंबर : दुसरीकडं राज्यातील महायुती सरकार पावसाळी अधिवेशनापासून विविध लोक कल्याणकारी योजना आणत आहे. तसेच अनेक घोषणांचा पाऊस पाडत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही कित्येक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळालं नाही. म्हणून विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी महायुतीनं गेल्या काही दिवसांपासूनच कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणजे महायुतीकडून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध योजना पाऊस होताना पाहायला मिळत आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

योजनेच्या महाराष्ट्रातच शुभारंभ का?: एकीकडं राज्यात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'ला चांगला प्रतिसाद मिळत असताना, आता दुसरीकडं केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी 'पीएम विश्वकर्मा' योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला. परंतु, ही केंद्र सरकारची योजना असताना दिल्लीत याचा शुभारंभ होणं अपेक्षित होतं. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या योजनेच्या महाराष्ट्रातच शुभारंभ का केला गेला? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.


दोन घटनांमुळं फासे पलटले :राज्य सरकारची बहुचर्चित 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' आल्यानंतर याची सर्वत्र राज्यभर चर्चा सुरू होती. महिला वर्गातून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत होता. ही योजना महायुतीला विधानसभेत तारेल, महायुतीला विधानसभा निवडणुकीत विजयी ठरवेल, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे. तर असं असताना ऑगस्ट महिन्यात घडलेल्या दोन घटनांमुळं सर्व फासे महायुतीच्या विरोधात पलटले. पहिलं कारण म्हणजे बदलापूरत एका शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना. या घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटले. दुसरी घटना म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आठ महिन्यापूर्वी मालवण येथे बसवलेला पुतळा कोसळला. या दोन्ही घटनावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडलं. विविध क्षेत्रातून सरकारच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळं सरकार कुठेतरी बॅक फुटवर गेल्याचं चित्र पाहायला मिळालं.

महाराष्ट्रात केंद्राच्या योजनेचा शुभारंभ: राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडत चालल्यामुळं राज्यात अनेक मोर्चे आणि आंदोलन झाली. परिणामी महायुती सरकारने जी वातावरणनिर्मिती केली होती ती या दोन घटनांमुळं राहिली नाही. परिणामी जनसामान्यांमध्ये सरकारच्या विरोधात संतापाची लाट उसळली. म्हणून विधानसभा निवडणुकीला काही दिवस बाकी असताना जनसामान्यांमध्ये सरकारची सकारात्मक प्रतिमा तयार करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर, 'पीएम विश्वकर्मा' ह्या केंद्राच्या योजनेचा शुभारंभही गुरुवारी महाराष्ट्रात केला. मात्र, यावरून विरोधकांनी महायुतीवर टीकास्त्र डागलं आहे.


निवडणुकीपूर्वी प्रत्येक सरकारची घोषणाबाजी : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीकडून मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले जात आहेत. विविध योजना आणल्या जात आहेत. केंद्र सरकारची 'पीएम विश्वकर्मा' ही योजना असताना याच्या शुभारंभ महाराष्ट्रात का? असा प्रश्न शिवसेना (शिंदे) आमदार संजय शिरसाट यांना विचारला असता, ते म्हणाले की, "निवडणुकीपूर्वी प्रत्येक सरकार हे टप्प्याटप्प्याने विविध निर्णय आणि विविध योजनांची घोषणा करत असते. मागील दहा-पंधरा वर्षातही असंच घडलं आहे. या घोषणा आणि योजनामुळं जनसमान्यांना फायदा होत असेल तर यात गैर काय. लाडकी बहीण योजना आणली तेव्हा विरोधकांनी टीका केली. याचे पैसे येणार नाहीत. परंतु, पैसे आल्यानंतर यांचं तोंड बंद झालं. आता पंतप्रधानांनी 'पीएम विश्वकर्मा' योजनेचा महाराष्ट्रात शुभारंभ केलाय. याचा कारागीर आणि कामगारांना फायदाच होईल, यात चुकीचं किंवा गैर काही नाही", तसेच योजनांची घोषणा करायची आणि त्याची अंमलबजावणी करायची नाही. फक्त जुमलेबाजी करायची, यातले आमचे सरकार नाही. आम्ही प्रत्येक योजनांची अंमलबजावणी करतो. त्या योजनांचा लाभ कसा शेवटच्या घटकापर्यंत पोहचेल हा आमचा प्रयत्न असतो. असेही म्हणायला आमदार संजय शिरसाट विसरले नाहीत.



देशाच्या पंतप्रधानांची कीव येते: लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानांनी अनेक सभा घेतल्या. महायुतीचा मोठा प्रचार केला. पण त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. आता निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असताना महायुतीच्या प्रचारासाठी योजनाच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचे लोकार्पणाच्या निमित्ताने सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येत आहेत. यापूर्वी देशाच्या कुठल्याही पंतप्रधानांनी निवडणूक काळात एवढ्या सभा घेतल्या नाहीत. तेवढ्या सभा मोदींनी घेतल्या आहेत. आता त्यांनी राज्यातील पालिका, जिल्हा परिषद या निवडणुकीच्या प्रचाराला ही जावे, असा टोला शिवसेना (ठाकरे गटाचे) खासदार अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला. तसेच मला पंतप्रधानांची कीव येते की, त्यांना अगदी लहानशा गोष्टींसाठीही महाराष्ट्रात यावे लागते. महायुती सरकारला लोकसभा निवडणुकीत लोकांनी नाकारलं. म्हणून आता ते विधानसभा निवडणुकीत मतदारांना प्रभावित करण्यासाठी, मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना आणल्या आहेत. पण राज्यातील जनता सुज्ञ आहे. यांच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही. असंही खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं.



काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? : 'पीएम विश्वकर्मा योजना' ही कुशल कारागीर यांच्या व्यवसायासाठी चालना देण्यासाठी किंवा त्यांना व्यवसाय करता यावा, यासाठी ही मुख्यत: योजना आहे. तसेच देशातील 140 होऊन अधिक जातीच्या लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अत्यंत कमी व्याजदराने तीन लाख रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जाणार आहे. या योजनेमध्ये 18 कारागीर आणि पारंपारिक कामगारांचा सहभाग आहे. दरम्यान, विश्वकर्मा योजनेअंतर्गत गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते 75 हजार लाभार्थ्यांना डिजिटल कर्ज देण्यात आले. तसेच संपूर्ण देशातील 18 कारागिरांना 1 लाखाचा धनादेश पंतप्रधानांच्या हस्ते देण्यात आला.

हेही वाचा -

  1. आंबेडकरांकडून तिसऱ्या आघाडीची घोषणा, यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाला मदत नाही - Prakash Ambedkar
  2. सरकारकडून मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजाची बोळवण, नेत्यांचा आरोप - Maratha OBC Reservation
  3. पितृपक्षातही राजकीय पक्षांच्या बैठकांना जोर, पितृपक्षाचा आमच्याशी संबंध नाही - काँग्रेसची प्रतिक्रिया - Maharashtra Politics

ABOUT THE AUTHOR

...view details