मुंबई Lok Sabha Election : मतदानाची प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी मतदारांना जास्तीत जास्त सुविधा पुरवण्याची गरज आहे. मुंबईत तापमान वाढलेलं असल्यानं मतदारांना रांगेत उभं राहण्यास त्रास होत आहे. त्यामुळं मतदान सुरळीत होण्यासाठी निवडणूक आयोगानं मतदारांना सुविधा पुरवून मतदानासाठी सहाय्य करावं, अशी मागणी शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला केलीय. तसंच निवडणूक आयोगानं केलेल्या नियोजनावर त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली.
आदित्य ठाकरेंची नाराजी : आदित्य ठाकरेंनी सोशल मीडियावर याबाबत एक चित्रफित प्रसारित करुन आपली नाराजी दर्शवली व आयोगाला आवाहन केलंय. "मुंबईतील मतदार सकाळी साडेसात वाजल्यापासून रांगा लावून मतदान करत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी मतदान केंद्रामध्ये सुविधांची कमतरता आहे. मतदारांना पिण्याचं पाणी उपलब्ध करुन देण्यात आलेलं नाही, पंखे नाहीत, या सुविधा पुरवण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे." तसंच अनेक ठिकाणी सावली नाही, त्यामुळं मतदारांना अशा विविध समस्यांमुळं त्रास होत आहे. मतदारांना दिलासा मिळेल अशी उपाययोजना आखण्याची गरज असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. या समस्यांमुळं मतदानाचा वेग कमी झालाय. निवडणूक आयोगानं रांगेत उभे असलेल्या मतदारांना मदत करावी आणि अधिकाधिक मतदान होईल याकडे लक्ष द्यावं अशी मागणीही ठाकरेंनी केलीय. तसंच दुपारची वेळ असल्यानं तापमान वाढतंय. त्यामुळं मतदानाचा टक्का घसरु नये यासाठी मतदारांना आवश्यक सुविधा पुरवण्याची गरज आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलंय. अनेक ठिकाणी मतदारांना मोबाईल घेऊन जाण्याबाबत संभ्रम निर्माण झालाय. मुंबईतील अनेक पोलिंग बुथवर सोयी सुविधांचा अभाव आहे. लांबच लांब रांगांमुळं मतदारांना त्रास होत असल्याचं चित्र आहे.