मुंबई Uddhav Thackeray : मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज मतदान होतंय. यात राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावलाय. त्यांनी वांद्रे इथं आपला मतदानाचा हक्क बजावलाय. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड तर महायुतीकडून उज्वल निकम निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामुळं उद्धव ठाकरेंच्या मतदानानंतर ठाकरेंनी पहिल्यांदाच काँग्रेसच्या पंजाला मतदान केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
पैशांच्या प्रलोभनांना जनता भुलणार नाही : उद्धव ठाकरेंनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, "देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी बाहेर पडून मतदानाचा हक्क अबाधित राहावा यासाठी मतदान करतील. आज एक निगेटिव्ह विषय हा जुमलेबाजांच्या बाजूनं जातोय. कारण जनता पैशाचा पाऊस स्वीकारणार नाही. कारण पैसा घेऊन कोणी आपलं आयुष्य विकात नाही." तसंच, पैशांच्या प्रलोभनांना जनता भुलणार नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
आजचं हे मत देशासाठी आणि संविधान संवर्धनासाठी महत्त्वाचं : मतदान केल्यानंतर आदित्य ठाकरेंनीही माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, "आम्ही देशासाठी मतदान केलंय. संविधान रक्षणासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी तुम्ही मतदान करा. हा तुमचा हक्क आणि अधिकार आहे. काही ठिकाणी मतदार यादीत गोंधळ दिसतोय, ऊन आहे, सावलीसाठी मंडप वगैरेची सोय करायला हवी. निवडणूक आयोगानं तयारी करायला हवी होती. अनेक ठिकाणी मतदानाच्या रांगा आहेत, मतदार बाहेर येतील आणि मतदान करतील."
दिग्गजांचं भवितव्य होणार मतपोटीत बंद : मुंबईतील सर्व सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या 13 जागांवर आज मतदार आपला हक्क बजावणार आहेत. यात डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, मिहिर कोटेचा, अरविंद सावंत, अनिल देसाई, उज्ज्वल निकम, अमोल कीर्तिकर, पियुष गोयल, वर्षा गायकवाड अशा दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये कैद होणार आहे.
हेही वाचा :
- ''मी काय ज्योतिषी आहे का?''; मतदानानंतर राज ठाकरे असं का म्हणाले? - lok sabha election
- दक्षिण मध्य मुंबईत मतदान केंद्रावर घोळ; मतदारांची नावं गायब, आयोगापुढे डोकं आपटायचं का, संतप्त मतदारांचा सवाल - Lok Sabha Election 2024