मुंबई Lok Sabha election : महाराष्ट्र राज्यात खरी लढत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असणार आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) 21 जागांवर निवडणूक लढवत आहे. त्यातच मुंबई मधील सहा लोकसभा मतदारसंघांपैकी चार जागा ठाकरे गट लढवत आहे. यातील दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघांसाठी महाविकास आघाडीकडून आज ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं.
मोदींचा ढोंगीपणा जनतेला कळतो : श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले की, "मला बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आहे. त्यासोबत उद्धव ठाकरे आणि वाहिनींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. यावेळी आपण नुसते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाही तर महाविकास आघाडीचे उमेदवार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, आप आणि इंडिया आघाडीतली तर पक्षांचा बरोबर पाठिंबा मिळत आहे. समोर कोण आहे हे माहित नाही. मात्र, विजयाची खात्री निश्चित आहे. कारण गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे." तसंच राज्यात पंतप्रधान मोदी सभा घेणार आहे यावर बोलताना सावंत म्हणाले की, "2014 सालची आठवण करा. काय घडलं? अहंकारातून आपण एकछत्री सत्ता आणू असं बोललं गेलं होतं. मात्र, महाराष्ट्रातील जनतेनं त्यांना जागा दाखवून दिली. त्यावेळी एकट्याच्या जीवावर उद्धव ठाकरे यांनी 43 आमदार निवडून आणले होते. ते विसरु नका. कोरोनाकाळात केलेल्या कामामुळं जनतेनं त्यांना कुटुंब प्रमुख पदवी दिली असून कुटुंबप्रमुखामागे महाराष्ट्र उभा आहे, तुम्ही कितीही सभा घ्या त्यांचा परिणाम होणार नाही. ज्या ज्या पद्धतीनं तुम्ही देवाचं नाव घेऊन खोटं बोलताय ते सर्व महाराष्ट्राला कळतंय ना तुमची लढाई भ्रष्टाचारा विरोधात ना, ना तुम्ही महिलांना सन्मान देत, ना रोजगार ना शेतकऱ्यांना दिलासा तर दुसरीकडे सीमेवर चीनची घुसघोरी, हे सर्व अपयश झाकायचं कसं यासाठी मोदी, इतर कोणी इथं येऊन ढोंगीपणा करताय हे जनतेला कळतंय." असा टोला अरविंद सावंत यांनी मोदी यांच्या सभेवरुन भाजपाला लगावलाय. तसंच त्यामुळं महाराष्ट्रात वेगळं चित्र दिसेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
लोकांची मेमरी शॉर्ट नाही : महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे उमेदवार आणि 'थिंक टँक'चे सदस्य अनिल देसाई देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. त्यापूर्वी त्यांनीही प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "आपल्या धार्मिक रीतीनुसार कोणतंही शुभकार्य करण्यापूर्वी सिद्धिविनायकचं दर्शन घेतलं." प्रथमच मैदानातली लोकसभा निवडणूक लढत आहात यावर बोलताना देसाई म्हणाले की, "या सगळ्या गोष्टी आधीही करत होतो. मैदानातील लढाई ठरवण्याचं काम करत होतो. आता प्रत्यक्ष मैदानात आहे. त्यामुळं तो अनुभव आणि केलेल्या कामाचा फायदा होणारच आहे. कोणतीही निवडणूक झाली तरी लोकशाहीचा खरा अधिकार हा मतदारांचा आहे. त्यामुळं मतदारांच्या दारात आपण जातोय. मोदी त्यांचे स्टार प्रचारक आहेत. त्यांचे जे महत्वाचे नेते आहेत. ते ते नेते प्रचाराला येणारच. हा एक निवडणूक प्रचाराचा भागच आहे, असं त्यांनी म्हटलंय. तसंच मोदी येणारच महाराष्ट्रात त्यांचा राबता दिसतोच आहे. शेवटी केलेलं काम आणि लोकांचे मुद्दे, महागाई कमी केली असेल लोक खुश असतील तर वेगळी गोष्ट आहे. महागाई बेरोजगारी किती वाढली शेवटी लोकांच्या समस्या असतील त्याचं निराकरण ज्या सरकारनं केलं असेल त्यांना एवढं सगळं करण्याची गरज काय भासते?" असा सवाल देसाई यांनी सत्ताधारी सरकारला केला. खालच्या पातळीवरील राजकारण गेल्या दोन वर्षात लोक बघत आहेत आणि लोकांची मेमरी शॉर्ट नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.