मुंबई Sanjay Raut :उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला वेषांतर करून गेले. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी सरकारवर टीका केली होती. यानंतर आज पुन्हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या वेषांतरावरून संजय राऊतांनी निशाणा साधलाय. हे सगळे तोंडं लपवून दिल्लीला जातात, असं संजय राऊत म्हणाले.
विष्णूचे 13 वे अवतार दिल्लीत : संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "महाराष्ट्रात नाटक, संगीत, चित्रपट, राजकारणाला फार मोठी परंपरा लाभली आहे. मराठी रसिक मराठी नाटक आणि रंगभूमीवर प्रेमही करतात. त्यामुळे आपले नवे बारामतीचे जे विष्णूदास आहेत, त्यांना विष्णूदास यासाठी म्हणावं लागलं; कारण विष्णूचे 13 वे अवतार दिल्लीत बसलेले आहेत. त्यामुळे ते विष्णूदास.”
सगळी पोरं हारुन अल-रशीदची : पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, "अजित पवारांनी अभिनयाची नाट्यकला दाखवली आहे. या नाट्यकलेचं नेपथ्य, संगीत, दिग्दर्शन आणि पडद्यामागची पटकथा हळूहळू समोर येईल. मग एकनाथ शिंदे असतील, ते तर मौलवीचा वेश धारण करून दिल्लीला गेले होते. ते अहमद पटेलांना भेटण्यासाठी पूर्वी वेषांतर करून गेले होते, असं त्यांचेच लोक सांगत आहेत. छगन भुजबळ यांनी सीमा भागात बेळगाव लढ्यासाठी वेषांतर केलं होतं. त्यावेळी त्यांना तुरुंगवास झाला होता. देशासाठी, महाराष्ट्रासाठी वेषांतर करणं समजू शकतो; पण एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी नकली दाढी लावून, खोटी नावं वापरून, वेषांतर करून मुंबई-दिल्ली विमान प्रवास केला. तोंडं लपवून दिल्लीला गेले. ही सगळी हारुन अल-रशीदची पोरं आहेत", अशी बोचरी टीका संजय राऊतांनी केली."
राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात :राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात कशा प्रकारे येऊ शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिंदे-फडणवीस-पवारांनी देशाला दाखवून दिलं आहे. सामान्य माणसाला विमानतळावर अडवलं जातं. माझ्यासारख्या खासदारांना, मंत्र्यांना अडवलं जातं; मात्र देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार वेषांतर करून खोटी कागदपत्रं बनवून दिल्लीला गेले. सीआरपीएफची सुरक्षा व्यवस्था गृहमंत्री अमित शाह यांच्या हातात आहे. त्यामुळे अमित शाहांनी यांना सोडा असं सीआरपीएफच्या सुरक्षेला आधीच कळवलं होतं. म्हणून यांना सोडलं गेलं. खोटी कागदपत्रं, खोटे बोर्डिंग पास वापरून या लोकांनी मुंबई-दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवास केलाय. हे देशासाठी, महाराष्ट्रासाठी अतिशय घातक आहे. दाऊद इब्राहिमला टायगर मेमनला सोडले का? विजय मल्ल्या, मेहुल चौक्सी यांना असंच सोडलं होतं का? हा चिंतनाचा विषय विषय आहे. सीआरपीएफच्या कमांडरना गृहमंत्र्यांचा आदेश असल्याशिवाय या वेषांतरीतांना प्रवेश मिळूच शकत नाही, असं राऊत म्हणाले.