पालघर : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं पालघर विधानसभा मतदारसंघातून पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना डावलून माजी खासदार राजेंद्र गावित यांना संधी दिली आहे. राजेंद्र गावित यांना पक्षप्रवेश देण्यापूर्वी श्रीनिवास वनगा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन दिवसांपूर्वी प्रदीर्घ चर्चा झाली होती. त्यावेळी वनगा यांना उमेदवारी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतरही तिकीट कापण्यात आल्यानं श्रीनिवास वनगा यांच्या भावनांचा बांध फुटला. तसंच अतिशय भावविवश होऊन त्यांनी प्रामाणिकपणाचं हेच फळ का?, असा सवालही त्यांनी केला.
उद्धव ठाकरेंची मागितली माफी : यासंदर्भात माध्यमांशी बोलत असताना श्रीनिवास वनगा यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची माफी मागितली. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांनी वनगा यांना उमेदवारी दिली होती. लोकसभेच्यावेळीदेखील दिलेला शब्द उद्धव ठाकरे यांनी पाळला. उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील श्रीनिवास यांना विधानसभेची उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. मात्र, तो शब्द त्यांनी पाळला नाही, अशी खदखद वनगा यांनी बोलून दाखवली. तसंच यावेळी त्यांनी साथ सोडून गेल्याबद्दल उद्धव ठाकरेंची माफीही मागितली. "उद्धव ठाकरे हे अतिशय प्रामाणिक आणि शब्द पाळणारे नेते आहेत. परंतु माझ्याकडून चूक झाली. मी शिंदे यांच्यासोबत गेलो. त्यांच्यासोबत गेलेल्या सर्व आमदारांना उमेदवारी देण्याचा शब्द त्यांनी दिला होता. परंतु, तो पाळला गेला नाही", असं वनगा म्हणाले.
भाजपाकडूनही फसवणूक झाल्याची मांडली व्यथा : "पूर्वीही भारतीय जनता पक्षानं लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारीचा दिलेला शब्द पाळला नाही. त्यावेळी मला डावलण्यात आलं. माझ्या वडिलांपासून केलेल्या प्रामाणिकपणाचं हेच फळ आम्हाला मिळालंय," अशी उद्विग्न भावना त्यांनी व्यक्त केली. "उद्धव ठाकरे माझ्यासाठी देव होते. ते दिलेला शब्द पाळत होते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्यावर मी विश्वास ठेवला. विश्वासघात झाला," असंही ते म्हणाले. हीच भावना श्रीनिवास यांच्या पत्नीनंही व्यक्त केली.