छत्रपती संभाजीनगर: भाजपा तर्फे मिशन महापौर राबवण्यात येत आहे. त्यासाठी जागोजागी सदस्य नोंदणी मोहीम सोबतच इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी रणनीती आखली जात आहे. कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश देण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं हे पाऊल उचललं जात आहे. या माध्यमातून आगामी काळात स्वबळावर लढण्यासाठी तयारी करत असल्याचं बोललं जातय. यावर रवींद्र चव्हाण यांनी मात्र बोलणं टाळलं.
ठाकरेंच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश:आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत पूर्ण ताकदीनं उतरण्यासाठी भाजपा तयारी करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अनेकांचे पक्ष प्रवेश केले जात आहेत. विशेषतः ठाकरेंचा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी प्रवेशासाठी प्रयत्न केले जात आहेत. सोमवारी (3 फेब्रुवारी) रोजी उस्मानपुरा येथील भाजपा कार्यालयात मोठा पक्षप्रवेश सोहळा घेण्यात आला. पक्षाचे नवनियुक्त संघटन प्रमुख रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पक्षात जाहीर प्रवेश दिला. मागील महिन्यात ठाकरेंच्या पक्षातील माजी नगरसेवकांना शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी पक्षाच्या नेत्यांच्या हस्ते प्रवेश दिला होता. त्यानंतर आज पुन्हा स्थानिक पदाधिकाऱ्यांना आपल्याकडं ओढत ठाकरेंच्या शिवसेनेला दणका देण्याचा प्रयत्न भाजपातर्फे करण्यात आला आहे.