नाशिक Hemant Godse Viral Video:लोकसभा निवडणूक तोंडावर असताना नाशिक लोकसभा मतदारसंघातून सलग दोनदा खासदार राहिलेले शिवसेनेचे हेमंत गोडसे यांचा महिलेबरोबरचा कथितरीत्या पॅसिव्ह स्मोकिंग करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं विरोधक जोरदार टीका करत आहेत. हा व्हिडिओ मॅार्फ करून राजकारण केलं जात असल्याचा आरोप खासदार हेमंत गोडसे यांनी केलाय. व्हायरल व्हिडिओ करणाऱ्याच्या विरोधात नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे ही जागावाटपात ही सीट भाजपाकडे येईल, या आशेमुळं इच्छुकांच्या आकांक्षा वाढल्या आहेत.
बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा : लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा खासदार गोडसे हे दिल्ली येथे होते. तिथून परतल्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस आयुक्तांकडं तक्रार केली. अधिवेशनाच्या कालावधीत आपण व्यस्त असताना अज्ञात व्यक्तीनं माझ्या बदनामीसाठी मॉर्फ व्हिडिओ तयार करून तो व्हायरल केला. या कथित मॉर्फ केलेल्या व्हिडिओची सविस्तर चौकशी करून बदनामीचा कट रचणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी, हेमंत गोडसे यांनी केलीय. याबाबत सायबर क्राईम विभागाच्या पोलीस निरीक्षकांना देखील या संदर्भात निवेदन देण्यात आलं आहे.
यांच्या विरोधात तक्रार दाखल :खासदार हेमंत गोडसे यांच्या संदर्भात फेसबुकवर आणि योद्धा ग्रुपवरील व्हायरल व्हिडिओ संदर्भात एका मोबाईल क्रमांकधारकाच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आलीय. अमोल चंद्रशेखर जोशी हे खासदार गोडसे यांचे कार्यालयीन प्रमुख आहेत. त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे, अतुल राजे भवर यांच्या फेसबुक अकाउंटवर हा व्हिडिओ दिसला. त्याचप्रमाणं योद्धा ग्रुपवर देखील हाच व्हिडिओ होता. त्यावर बदनामीकारक मजकूर होता. या संदर्भात अमोल जोशी यांनी खासदार गोडसे यांच्याशी संपर्क साधला. त्यांवेळी गोडसे यांनी हा व्हिडिओ माझा नसून मॉर्फ केला आहे असं सांगितलं.