महाराष्ट्र

maharashtra

"त्यानंतर पठ्यानं मराठीत.."शरद पवारांनी खासदार लंकेच्या इंग्रजी शपथेमागील सांगितली इनसाईड स्टोरी - Sharad Pawar News

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 15, 2024, 4:52 PM IST

Sharad Pawar on Nilesh Lanke : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे निलेश लंके यांनी संसदेत इंग्रजीत शपथ घेऊन भाजपाच्या सुजय विखेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. त्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी इनसाईड स्टोरी सांगितली. ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.

Sharad Pawar told history of how Nilesh Lanke took MP oath in english
शरद पवार आणि निलेश लंके (ETV Bharat)

मुंबई Sharad Pawar on Nilesh Lanke : अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत निलेश लंके आणि सुजय विखे पाटील यांच्यात जोरदार वाक्युद्ध रंगलं होतं. "राष्ट्रवादीच्या उमेदवाराला इंग्रजी येत नाही," अशी खिल्ली महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी उडवली होती. त्यानंतर खासदार झाल्यावर निलेश लंके यांनी चक्क इंग्रजीतून शपथ घेत सुजय विखे पाटलांनी उडवलेल्या खिल्लीचा वचपा काढला. निलेश लंकेंनी इंग्रजीत शपथ घेण्यापूर्वी काय घडलं, याची माहिती शरद पवार यांनी एका कार्यक्रमात सांगितली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (ETV Bharat Reporter)

पारनेरच्या खासदारानं इंग्रजीत शपथ घेतली : माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार म्हणाले, "लोकसभा निवडणुकीनंतर खासदारकीची शपथ घेण्यापूर्वी पारनेरचे खासदार निलेश लंके दिल्लीतील माझ्या निवासस्थानी आले होते. निलेश लंके आणि कार्यालयातील कर्मचारी यांच्यात चर्चा सुरू होती. इंग्रजीत शपथ कशी घ्यायची? याविषयी ते सराव करत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर लंके यांनी संसदेत इंग्रजीत शपथ घेतली. मात्र, त्यांना मी सांगितलं की आपण संसदेत मराठीतही बोलू शकतो. त्यानंतर पठ्यानं मराठीत भाषण ठोकलं", असं पवारांनी सांगितलं.

आनंदराव अडसूळ यांची केली प्रशंसा : शरद पवार यांच्या हस्ते उदय गुलाबराव शेळके फाउंडेशनच्या बोधचिन्ह आणि संकेतस्थळाचा अनावरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात शिवसेनेचे नेते तथा माजी खासदार आनंदराव अडसूळ हेदेखील उपस्थित होते. यावेळी राजकीय मतभेद बाजूला ठेवत शरद पवारांनी आनंदराव अडसूळ यांच्या कामाची प्रशंसा केली. ते म्हणाले की, "प्रत्येक क्षेत्रात मालकाचे आणि कामगारांचे काही वाद असतात. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील सहकारी बँकेच्या कामगारांचं नेतृत्व आनंदराव करत आहेत. लोकांच्या प्रश्नासाठी ते संघर्ष करत आहेत. मात्र, ते कोणालाही आपल्यापासून तुटू देत नाहीत. कोणत्या ठिकाणी थांबायचं, याबाबतचं तत्व त्यांनी कायम पाळलंय."


सावली देणारी वटवृक्ष म्हणजे शरद पवार : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी कार्यक्रमादरम्यान बोलताना शरद पवार यांची स्तुती केली. ते म्हणाले, "सत्ता कोणाचीही असो अख्या महाराष्ट्राला छाया देणारं वटवृक्ष म्हणजे शरद पवार आहेत. पक्षी घर करुन त्या वटवृक्षावर राहतात. मात्र, काही पक्षी घरट्यातून उडून गेले तरी त्यांना काही वाटतं नाही", असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला.

हेही वाचा -

  1. इंग्रजी येत नसल्यानं सुजय विखेंनी उडवली खिल्ली; शरद पवारांच्या 'या' पठ्ठ्यानं इंग्रजीत घेतली 'खासदारकी'ची शपथ - Nilesh Lanke Oath In English

ABOUT THE AUTHOR

...view details