कोल्हापूरSharad Pawar News - "बदलापूरातील आंदोलनात बाहेरून लोक आणले असे सरकारचं म्हणणं आहे. बदलापूरचे आंदोलक आम्ही गोळा केले नाहीत. चीड व्यक्त करणाऱ्यांवर खटले भरणं गैर आहे. आंदोलकांवर खटले भरणं हे निंदनीय आहे, असे स्पष्ट मत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. महिला अत्याचारांमध्ये सतत वाढ होत आहे. गृहमंत्री जबाबदाऱ्यांची पूर्तता करत नाहीत, अशी टीकाही पवार यांनी केली.
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी टीका केली. त्यावर शरद पवार म्हणाले, "अनुभव नसणाऱ्यांना शिवरायांच्या पुतळ्याचे काम कसे दिले? पुतळा कोसळण्यामागे वाऱ्याच्या वेगाचे कारण दिले होते. शिवरायांचा समुद्रकिनारी असलेला पुतळा जशाच्या तसा आहे." पुतळा कोसळण्यामागे जी कारण सांगितली जातात, ती योग्य नाहीत. या विरोधात मुंबईत आम्ही आंदोलन केलं. त्यावर आम्ही राजकारण करत आहोत अशी टीका होतेय. मालवण किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर शिवभक्तांच्या भावना तीव्र होत्या. त्याला राजकारण म्हणता येणार नाही," असं सांगत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर पलटवार केला.
शिवरायांचा खोटा इतिहास जनतेसमोर मांडू नये-"शिवरायांनी सुरत लुटली नव्हती," असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार म्हणाले, " शिवरायांनी सुरतची लूट दोन वेळा केल्याचं इतिहासकार सांगतात. शिवरायांनी सुरतची लूट केली नसल्याचं भाजपाचं म्हणणं आहे. राज्यकर्त्यांकडून शिवरायांबाबत वेगवेगळी विधाने केली जात आहेत. शिवरायांचा सुरतेवरील स्वारीचा उद्देश वेगळा होता. शिवरायांचा खोटा इतिहास जनतेसमोर मांडू नये." "काँग्रेसनं चुकीचा इतिहास समोर आणला असंही त्यांचं म्हणणं आहे. मात्र यावर बोलण्याचा इतिहास संशोधकांचा अधिकार आहे. काल इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी याबाबत इतिहास सांगितला. चुकीचा इतिहास जनतेसमोर आणला तर त्याचा चुकीचा परिणाम होतो," असे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.
स्थिर सरकार देणं हे आमचे उद्दिष्ट -आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं राज्यात मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत. मात्र, अद्याप महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यात आला नाही. त्यावर राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार म्हणाले, "मुख्यमंत्री पदाचा निर्णय निवडणुकीनंतर संख्याबळावर होणार आहे. आताच मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर व्हावे, अशा आग्रहाची गरज नाही. काँग्रेस, ठाकरे गट किंवा आमचा कोणाचाही मुख्यमंत्री होऊ शकतो. तिन्ही पक्ष एकत्र येऊन निर्णय घेऊ. स्थिर सरकार देऊ. स्थिर सरकार देणं हे आमचं उद्दिष्ट आहे."