शरद पवार यांची पत्रकार परिषद पुणे Sharad Pawar News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भाषा (स्क्रिप्ट) बोलत असल्याची टीका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. या मुद्द्यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलत असताना भाष्य केलं. "जबाबदार लोक इतकं पोरकट बोलतात, हे मी महाराष्ट्रात कधीही बघितलं नाही," असा त्यांनी टोला लगावला.
नेमकं काय म्हणाले शरद पवार? :यावेळी बोलत असताना शरद पवार म्हणाले की, " मी यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत सर्वांना पाहिलंय. जरांगेंविषयी बोलायचं झालं तर त्यांचं उपोषण जेव्हा सुरू झालं होतं, तेव्हा सर्वप्रथम मी त्यांना भेटायला गेलो. त्यावेळी मी त्यांना म्हणालो होतो की, तुमच्या मागण्या मी समजू शकतो. मात्र, दोन समाजांमध्ये तेढं निर्माण होईल असं काहीही करू नका. त्यादिवसानंतर माझं त्यांच्याशी बोलणंच झालं नाही", असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.
कर नाही त्याला डर कशाला?मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरून राजेश टोपे यांच्यावरदेखील आरोप केले जात आहेत. याबाबत पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की" त्यांच्यावरदेखील 100 टक्के चुकीचे आरोप केले जात आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी राजेश टोपे यांची मदत राज्य सरकार घेत होते. एका बाजूला त्यांची मदत घेणे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर प्रहार करणं चुकीचं आहे." मनोज जरांगे पाटील यांची एसआयटीमार्फत चौकशी होणार आहे. याबाबत पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, "मनोज जरांगे यांची हवी ती चौकशी करा. आमचं काहीही म्हणणं नाही. माझ्या फोनवरून एक जरी जरांगे यांना फोन केला असेल तर मी वाटेल ते करेल. कर नाही त्याला डर कशाला? " असे यावेळी पवार म्हणाले.
बैठकीबाबत काय म्हणाले? : आज (27 फेब्रुवारी) पार पडलेल्या बैठकीसंदर्भात अधिक माहिती देत पवार म्हणाले की,"लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट), ठाकरे गट आणि कॉंग्रेस पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहे. तसंच वंचितनंही एकत्रित सहभागी व्हावे, असा आमचा विचार आहे. या मुद्द्यावर आज वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा होणार होती. मात्र, त्यांची सभा असल्यामुळं ते नाही येऊ शकले. त्यामुळं उद्या त्यांच्यासोबत बैठक होणार आहे.
कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहणारकार्यकर्त्यांवर दबाव टाकला जात आहे का, याबाबत पवार म्हणाले की, " आज अनेकांनी अस सांगितलं की, काही लोकांकडून दमदाटी करण्यात येत आहे. त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. शैक्षणिक तसेच सहकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना नोकरीतून मुकावं लागणार आहे, अशा पद्धतीची दमदाटी केली जात आहे. अशा पद्धतीनं जर कोणीही दमदाटी करत असेल तर आम्ही त्या कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहणार आहोत."
सर्वांना निवडणूक लढविण्याचा अधिकार-बारामती लोकसभेत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे.नवीन उमेदवार येत असेल तर आनंद आहे. आजपर्यंत मी १४ निवडणूक लढून त्यात अडकून पडलो नाही. मग आता काय अडकून पडणार आहे? यावेळी माजी मुख्यमंत्री पवार यांनी अजित पवार यांच्यावर बोलण्यास नकार दिला.
हेही वाचा -
- शरद पवारांमुळं मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही, 23 मार्चला बारामतीतील निवासस्थानी मोर्चा काढणार - नामदेव जाधव
- देशाची नाही तर, शरद पवारांच्या पक्षाची परिस्थिती बिकट, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
- शरद पवार यांचं नाव घेतल्याशिवाय 'यांची' हेडलाईन होत नाही; सुप्रिया सुळेंची टीका