महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

शिवसेनेच्या उमेदवाराला 'जरांगे फॅक्टर'ची भीती? अंतरवालीत जात दिलं स्पष्टीकरण - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

कालीचरण महाराजांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळं शिवसेना नेते संजय शिरसाठ यांनी आज अंतरवालीत जाऊन जरांगे यांची भेट घेतली.

Maharashtra Assembly Election 2024
संजय शिरसाट यांनी घेतली जरांगे पाटील यांची भेट (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2024, 6:58 PM IST

छत्रपती संभाजीनगर : कालीचरण महाराज यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळं, पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. सकाळीच शिरसाट यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. "कालीचरण महाराजांना आपण प्रचारासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी बोलावलं नव्हतं," असं स्पष्टीकरण शिरसाट यांनी दिलं.

कालीचरण महाराज यांच्या वक्तव्यामुळं गदारोळ : मनोज जरांगे यांच्याबद्दल कालीचरण महाराजांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलंय. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंबईला जाताना एका ठिकाणी चादर चढवली होती. त्यावरुन कालीचरण महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरुन सोशल मीडियाच्या माध्यमातून कालीचरण महाराज यांच्यावर टीका केली जात आहे.

संजय शिरसाट यांनी घेतली जरांगे पाटील यांची भेट (ETV Bharat Reporter)

शिरसाट यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट : छत्रपती संभाजीनगर शहर पश्चिम मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात हे वक्तव्य केल्यानं, त्यांनीच या महाराजांना बोलावलं होतं, असा संदेश सर्वत्र पसरला. त्यामुळं लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा फटका ज्या पद्धतीनं बसला तसाच परिणाम कालीचरण महाराजांच्या वक्तव्यामुळं होईल, अशी भीती शिरसाट यांना असावी. त्यामुळं त्यांनी तातडीनं अंतरवाली सराटी गाठत जरांगे यांची भेट घेतली.

मी बोलावलं नाही : कालीचरण महाराज यांच्या वक्तव्यामुळं मराठा समाज संतप्त झाला. विशाल हिंदू जनजागरण महासभा या कार्यक्रमात कालीचरण महाराज यांनी वक्तव्य केलं. सदरील कार्यक्रम पश्चिम मतदारसंघात आयोजित होता. हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी संजय शिरसाट यांनी कालीचरण महाराजांना बोलावलं होतं, अशी चर्चा रंगली. मराठा समाजाचा रोष ऐन मतदानाच्या एक दिवस आधी ओढवू नये यासाठी शिरसाट यांनी मंगळवारी सकाळीच अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे यांची भेट घेऊन सदरील कार्यक्रम आम्ही आयोजित केला नव्हता, असं स्पष्टीकरण दिलं. त्या कार्यक्रमाचा आमच्याशी संबंध नाही, त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी माध्यमांना दिलं.

कार्यक्रम त्यांचाच : विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मात्र महाराजांना शिरसाट यांनीच बोलावलं होतं, असा आरोप केलाय. "त्यांना जे बोलायचे ते त्यांनी स्वतः बोलावे, महाराजांच्या तोंडून असं बोलावून घेणं चुकीचं आहे. ते एकट्या जरांगे पाटील यांना नाही तर सर्वांनाच बोलले आहेत," अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

हेही वाचा -

  1. मराठा युवकांचं धाराशिवमधील आंदोलन स्थगित, इमारतीवरून उडी मारण्याचा दिला होता इशारा - Maratha Agitation
  2. मराठा आरक्षण मुद्दा तापला; अंबडमध्ये आंदोलकांनी पेटवली एसटी बस, संचारबंदी लागू, इंटरनेट, बस बंद
  3. जनतेच्या हक्कावर अतिक्रमण न करता मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन करावं, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

ABOUT THE AUTHOR

...view details