मुंबई : मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दावोस दौऱ्यात 'ऑपरेशन टायगर'ची घोषणा केली होती. शिवसेनेत एकामागून एक प्रवेश होत जुने सहकारी आपल्यासोबत येतील, असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर काही दिवसांतच रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी शिवसेनेत प्रवेश करत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. त्यामुळं शिवसेनेच्या 'ऑपरेशन टायगर'ची महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. यावरुनच आता शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर जोरदार टीका केलीय.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत? : माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, "कसलं ऑपरेशन टायगर? आज त्यांच्याकडं सत्ता आहे. त्यामुळे त्यांना सत्तेची मस्ती चढलीय. आम्हीही सत्ता भोगलेली आहे. परंतु, सत्तेचा माज आणि अशी विकृती केलेली नाही. सत्ता आणि यंत्रणा असल्यामुळं ते दुसऱ्यांवर दबाव टाकत आहेत. परंतु, फक्त दोन तास ईडी आमच्या ताब्यात द्या. मग अमित शाहसुद्धा आमच्या पक्षात येतील की नाही ते बघा. दोन तास ही सर्व यंत्रणा आमच्या हातात असेल तर हे सर्व नेते बावनकुळेंपासून ते सगळे मातोश्रीवर येऊन आमच्या पक्षात प्रवेश करतील," अशी टीका संजय राऊत यांनी केली.
दिल्लीतील चेंगराचेंगरी 100 ते 130 जणांचा मृत्यू : नवी दिल्लीमधील रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. "प्रयागराजमध्ये अनेक लोकांचा चिरडून मृत्यू झाला. तिथं 7000 च्या वर लोकं गायब आहेत. ही घटना ताजी असतानाच आता दिल्लीतील रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीत अनेकांचे मृत्यू झालेत. सरकार सांगतंय 18 लोक गेलेत. परंतु, माझ्या माहितीप्रमाणे 100 ते 130 लोकांचा मृत्यू झालाय," असा दावा संजय राऊत यांनी केलाय.