महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

जागा वाटप ही प्राथमिकता नसून, देशात भाजपाचा पराभव हीच आमची प्राथमिकता : संजय राऊत - खासदार संजय राऊत

Sanjay Raut on MVA Meeting : महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज पुन्हा जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी बैठक पार पडली. आजच्या या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर संजय राऊतांनी बैठकीत काय चर्चा झाली, याबाबत माहिती दिली.

Sanjay Raut on MVA Meeting
Sanjay Raut on MVA Meeting

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 2, 2024, 7:09 PM IST

मुंबई Sanjay Raut on MVA Meeting : लोकसभा निवडणूक जागा वाटप तसंच महाविकास आघाडीतील किमान समान कार्यक्रमाबाबत आज महाविकास आघाडीची तिसरी बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीसाठी शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते उपस्थित होते. मात्र वैयक्तिक कामानिमित्त अर्धवट बैठक सोडून प्रकाश आंबेडकर निघून गेले. बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा तसंच किमान समान कार्यक्रमावर देखील चर्चा झाल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं.

वातावरण बदलण्यासाठी एकत्र राहिलं पाहिजे : बैठकीनंतर बोलताना संजय राऊत म्हणाले, "आजच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. ते या बैठकीत सामील झाले होते. मविआची पुढील दिशा तसंच अनेक विषयावर चर्चा झाली. महाविकास आघाडीत आम्ही सर्वांनी एकत्र राहायचं यावर निर्णय झाला. देशात सध्या लोकशाही विरोधी वातावरण आहे, ते वातावरण बदलण्यासाठी सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि भाजपाला मदत होईल असं कोणतंही पाऊस उचलू नये यावर चर्चा झाली."


राज्याचं राजकारण गटांगळ्या खातंय : राज्यातील राजकारणाबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले, "सध्या महाराष्ट्रातील राजकारण एका वेगळ्या परिस्थितीतून जात आहे. राज्यातील राजकारण गटांगळ्या खातंय. देशपातळीवर हुकूमशाही, एकाधिकारशाही वाढत आहे. भाजपाच्या या एकाधिकारशाही सरकारला पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. यावर आमचं एकमत झालं, याबाबत चर्चा झाली. तसंच पुढील बैठकसुद्धा आम्ही लवकरच घेणार आहोत. पुन्हा आम्ही सर्व एकत्र भेटणार आहोत."


भाजपाचा पराभव हीच आमची प्राथमिकता : या बैठकीत जागा वाटपावर काही चर्चा झाली का? किंवा त्यावर काही तोडगा निघाला का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला असता ते म्हणाले, "जागावाटप ही आमची प्राथमिकता नाही, तर देशात भाजपाचा संपूर्ण पराभव हीच आमची प्राथमिकता आहे. हेच आमचं प्राधान्य आहे. तसंच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी या सर्व पक्षांमध्ये अजिबात मतभेद नाहीत. महाविकास आघाडीमध्ये किमान समान कार्यक्रम कसा राहील यावर आम्ही काम करणार आहोत. किमान समान कार्यक्रमामध्ये शेतकरी, मजूर, महिला, कष्टकरी, विद्यार्थी यांच्याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी काही सूचना केल्या आहेत. याबाबत पुढील बैठकीत चर्चा होईल."


इंडिया आघाडी मजबूत : इंडिया आडीत फूट पडली असून, आता इंडिया आघाडी शिल्लक नाही असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, "इंडिया आघाडीत जागा वाटपावरून काही मतभेद असतील, मात्र इंडिया आघाडीत फूट पडली किंवा इंडिया आघाडी संपली असं म्हणणं चुकीचं आहे. कारण दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेस हे युती करुन निवडणूक लढवत आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस हा पक्ष भाजपाचा पराभव करण्यास समर्थ आहे. तसंच पुढील इंडिया आघाडीची बैठक ही स्वतः ममता बॅनर्जी बोलावणार आहेत. त्यामुळं इंडिया आघाडीत कोणतीही फूट नाही."

ते राज ठाकरेंनी ठरवावं : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीसोबत जायचं की, महाआघाडीसोबत जायचं याची चाचपणी करत असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय. यावर राऊत म्हणाले, "एकीकडे जे महाराष्ट्र लुटत आहेत. मुंबई लुटत आहेत. त्यांच्याबरोबर आपण जावं की, महाराष्ट्र आणि देश एकसंघ कसा राहील याबरोबर यावं, हे राज ठाकरेंनी ठरवावं."

हेही वाचा :

  1. महाविकास आघाडीतील मतं फोडण्याचा भाजपाचा पुन्हा प्रयत्न, राज्यसभा निवडणुकीत भाजपा देणार चौथा उमेदवार?
  2. बाबा सिद्दिकींच्या काँग्रेस सोडून जाण्याच्या चर्चांवर काय म्हणाले संजय राऊत?

ABOUT THE AUTHOR

...view details